जागतिक पातळीवर आलेली आर्थिक महामंदी ‘ब्रिक्स’ राष्ट्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने हाताळली. त्यामुळेच, आर्थिक संकटानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आता या देशांची भूमिका निश्चितच महत्त्वाची राहील, असे भारताने म्हटले आहे.
गुरुवारी येथे ‘ब्रिक्स’ देशांच्या अधिकाऱ्यांची परिषद पार पडली. या परिषदेत भारतीय दूतावासातील आर्थिक विभागाच्या कौन्सिलर सुमिता दावरा सहभागी झाल्या होत्या. ‘जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या, एकूण भूभागापैकी ३० टक्के भूभाग ‘ब्रिक्स’ देशांनी व्याप्त केला आहे. या देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सन २००० मध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्या तुलनेत, २०१०मध्ये हीच वाढ २५ टक्क्यांनी नोंदविली गेली. आणि हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानदायी कालखंड होता, असे दावरा म्हणाल्या.
ब्राझील, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थांच्या भविष्यातील वाटचालीबाबत करण्यात येत असलेल्या भाकितांमध्ये वैविध्य असले तरीही आगामी काळात या देशांमधील एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न जगातील एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत ४० टक्के असेल, असे भाकीत गोल्डमन सॅचने नोंदविले असल्याचे सुमिता दावरा यांनी अधोरेखित केले.