BRICS Leaders Special Menu Delhi Hotels : भारताच्या राजधानीत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे असल्याने नवी दिल्ली एका उच्च स्तरीय राजनैतिक बैठकीसाठी सज्ज जाली आहे. या वर्षी ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इंडोनेशिया, इराण आणि यूएई (UAE) च्या नेत्यांसह इतर भागीदार देशांचे स्वागत करतील. ही शिखर परिषद भारत मंडपम येथे होणार आहे. मात्र, या परिषदेची सर्वात मनोरंजक तयारी दिल्लीतील आलिशान हॉटेल्समध्ये पडद्यामागे सुरू आहे, जिथे हे प्रतिनिधी मुक्कामास असणार आहेत.
दिल्लीतील नामांकित हॉटेल्स परदेशी पाहुण्यांना भारताची झलक दाखवण्यासाठी आणि त्यांच्या विविध खाद्यसंस्कृतीच्या आवडीनिवडी जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ब्रिक्स प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेल्या ‘द लीला पॅलेस’, ‘ताज महाल’ आणि ‘द ललित’ या तीन हॉटेल्सनी त्यांच्या खास मेन्यूबद्दल एनडीटीव्हीला महत्त्वाची माहिती दिली आहे.
ताजमध्ये ट्रेडिशन टू टेबल
दिल्लीतील ताज महाल हॉटेल ब्रिक्स प्रतिनिधींचं स्वागत ‘ट्रेडिशन टू टेबल’ या संकल्पनेने करेल. ही ताजच्या शेफ्सनी तयार केलेली आणि त्यांच्या आईकडून प्रेरणा घेतलेली खास रेसिपींची मालिका आहे. यामुळे भारतीय आदरातिथ्य आणि खाद्यसंस्कृतीची परंपरा दिसणार आहे. या संकल्पनेत शेफ्सच्या बालपणीच्या आणि त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध असलेल्या रेसिपींचा समावेश आहे. यामध्ये भारतातील ६ वेगवेगळ्या प्रांतांतील पारंपारिक चवदार पदार्थांची निवड करण्यात आली आहे. यात काश्मीरचे तिखट-मसालेदार अक्रोड, पुरानी दिल्लीचे मैदा काजू, महाराष्ट्राची बाकरवडी, राजस्थानची मिनी कचोरी, बंगालची कुचो निमकी आणि तमिळनाडूच्या मुरुक्कूचा समावेश आहे.
ताज महाल, नवी दिल्लीचे एरिया डायरेक्टर, ऑपरेशन्स आणि जनरल मॅनेजर डॉ. अनमोल अहलुवालिया म्हणाले, “गेल्या जवळपास पाच दशकांपासून ताज महाल, नवी दिल्लीला जगभरातील राष्ट्रप्रमुख, मुत्सद्दी आणि प्रतिष्ठित नेत्यांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाला आहे. भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा दर्शवणारी ही भेट, ताजच्या आदरातिथ्याची उबदारता, काळजी आणि आपुलकीचे प्रतीक आहे.”
द लीलामध्ये राष्ट्रीय फुलाचं महत्त्व करणार अधोरेखित
द लीला पॅलेस नवी दिल्ली ब्रिक्स शिखर परिषद २०२६ च्या प्रतिनिधींसाठी एक विशेष खाद्य अनुभव सादर करणार आहे. यामध्ये देशाच्या समृद्ध वारशाचा आधुनिक पद्धतीने मेळ घालण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक खाण्यायोग्य कमळ (edible handcrafted lotus) तयार करण्यात आले आहे. हे फूल ‘ब्रिक्स इंडिया २०२६’ च्या ओळखीचे (लोगोचे) प्रतीक आहे आणि द लीलाच्या स्वतःच्या प्रवासाशीही त्याचा खास संबंध आहे. गुलाब, केशर आणि वेलचीचा वापर करून बनवलेले हे कमळ भारतीय फळांसह सादर केले जाईल, जे भारतीय कलाकुसरीचे एक वेगळे रूप आहे.
द लीला पॅलेस नवी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह शेफ करण ठाकूर यांनी सांगितले, “पॅलेसच्या पाककला टीमने खास तयार केलेल्या पदार्थांद्वारे हा अनुभव पुढे सुरू राहील, ज्याचा आस्वाद आमचे पाहुणे आनंदाने घेतात आणि भेट देणाऱ्या शिष्टमंडळांनीही याचे विशेष कौतुक केले आहे. यासोबतच ‘औजस्य बाय द लीला’ मिलेट्स कुकीज, हाताने बनवलेले ग्रॅनोला बार आणि वेलनेस इन्फ्युजन्स (आरोग्यदायी पेये) दिली जातील. भारतीय घटकांची समृद्धता आणि पोषणाचा आधुनिक दृष्टिकोन यात एकत्र आणला आहे. आमच्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना भारताची एक परिष्कृत, वैशिष्ट्यपूर्ण आणि द लीलाच्या आदरातिथ्याच्या तत्त्वांवर आधारित अनुभूती मिळावी म्हणून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.”
द ललितमध्ये तृणधान्यांना दिले महत्त्व
द ललित हॉटेलने ब्रिक्स परिषदेसाठी एक खास मेनू तयार केला आहे, जो भारताच्या समृद्ध प्रांतीय खाद्यसंस्कृतीचा उत्सव साजरा करतो आणि त्याच वेळी या जागतिक परिषदेची भावना देखील प्रतिबिंबित करतो. पारंपारिक बँक्वेट जेवणाच्या पलीकडे जाऊन, यात गलौटी कबाब आणि तंदूर-बेक्ड ब्रेड्स यांसारख्या प्रसिद्ध पदार्थांना एक नवा आणि आधुनिक ट्विस्ट देण्यात आला आहे. तसंच, भारताची पोषण परंपरा आणि आधुनिक पाककला दर्शवणारे तृणधान्य-आधारित (millet-forward) पदार्थही यात समाविष्ट आहेत. याशिवाय, शेफ्सनी काही वैशिष्ट्यपूर्ण फ्युजन पदार्थ तयार केले आहेत, ज्यामध्ये ‘ब्रेझ्ड एगप्लांट विथ मिसो पेस्ट’ (Braised Eggplant with Miso Paste), ‘सिमर्ड चायनीज कॅबेज’ (Simmered Chinese Cabbage) आणि ‘किडनी बीन स्वीट जपानी स्टाईल विथ अंबर सॉस’ (Kidney Bean Sweet Japanese Style with Amber Sauce) यांचा समावेश आहे.
द ललित नवी दिल्लीचे जनरल मॅनेजर विशाल शर्मा म्हणाले, “भारतीय आदरातिथ्याची उबदारता कायम ठेवत वेगवेगळ्या देशांतील खाद्यसंस्कृती एकाच टेबलवर आणण्याचा हा आमचा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हा मेनू आमच्या शेफ्ससाठी एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो ‘द ललित’च्या प्रतिष्ठेला साजेसे, सन्माननीय आणि अस्सल भारतीय आदरातिथ्याचे प्रतिनिधित्व करतो.”
तर, द ललितचे एक्झिक्युटिव्ह सॉस शेफ अमित बिस्वास पीटीआयला म्हणाले, “आम्ही या ब्रिक्स परिषदेत तृणधान्यांना विशेष प्राधान्य देत आहोत. आपले पंतप्रधान तृणधान्यांवर अधिक भर देत असल्याने, आम्हीही ब्रिक्समध्ये त्याचा प्रचार-प्रसार करत आहोत. याशिवाय, आमच्याकडे मोठ्या संख्येने परदेशी पाहुणे मुक्कामास असल्याने, आम्ही नाश्त्याचा मेनू अतिशय विचारपूर्वक तयार केला आहे. सर्व पाहुण्यांना अन्नाचा आस्वाद घेता यावा, यादृष्टीने मसाल्यांचे प्रमाण आणि पदार्थांची निवड नियंत्रित ठेवली आहे. ही ब्रिक्स परिषद असल्याने, आम्ही सर्व मिष्टान्न आणि मुख्य जेवणातील बहुतांश पदार्थ अशा पद्धतीने तयार केले आहेत, जेणेकरून अस्सल भारतीय खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडेल. यासाठी आम्ही भारतीय मसाले, पारंपारिक भाज्या आणि शेतात पिकवलेल्या ताज्या भाज्यांचा वापर केला आहे. आमचे पाहुणे भारतातील स्थानिक उत्पादने आणि अन्नपदार्थ पाहू शकतील व अनुभवू शकतील, यासाठी आम्ही प्रामुख्याने स्थानिक उत्पादनांवर अधिक भर देत आहोत.”
