BRICS Summit 2026 : दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी यंदाची १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडत आहे. या ब्रिक्स परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. ही ब्रिक्स परिषद भारतात होत असल्याने जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. मात्र, या ब्रिक्स परिषदेवरून काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील मतभेद आता समोर आले आहेत. या परिषदेवर काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी ‘ब्रिक्स’कडून भारताला नक्की काय मिळालं? किंवा ठोस फायदे काय झाले? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर यांनी या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’चं कौतुक केलं आहे. चिदंबरम आणि थरूर यांच्यातील या मतभेदामुळे आता भाजपाला टीका करण्यासाठी एक नवा मुद्दा मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

पी. चिदंबरम यांनी गुरुवारी ब्रिक्स शिखर परिषदेच्या फायद्यांवरून सवाल उपस्थित केले. दुसरीकडे शशी थरूर यांनी या ब्रिक्स परिषदेचं यजमानपद भारताने भूषवणं ही ‘अत्यंत प्रतिष्ठेची बाब’ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमधील या परस्परविरोधी भूमिकांवरून चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

शशी थरूर यांनी काय म्हटलं?

“सर्वप्रथम आपण ‘ग्लोबल साउथ’साठी एक महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला माहित आहेच की, ‘ग्लोबल साउथ’मध्ये १०० पेक्षा अधिक देशांचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणी ‘ग्लोबल साउथ’मधील ११ प्रमुख देश एकत्र आले आहेत. हे देश एकत्रितपणे विविध दृष्टिकोन आणि देशांच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. ज्यांचं नेतृत्व आपण या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने करत आहोत. ब्रिक्समधील हे ११ देश जगातील बहुसंख्य लोकसंख्या असलेले आणि जागतिक जीडीपीच्या ४१ टक्के हिश्शाचे प्रतिनिधित्व करतात”, असं थरूर यांनी म्हटलं आहे.

शशी थरूर यांनी भारताच्या यजमानपदाच्या निर्णयाचंही समर्थन केलं. दिल्लीत अनेक जागतिक नेत्यांची उपस्थिती असणं ही एक मोठी राजनैतिक जमेची बाजू असल्याचं सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक देशांचे प्रमुख ब्रिक्सच्या निमित्ताने भारतात येणं ही आपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे. यातून भारताची ‘राजनैतिक पातळीवर विविध देशांना एकत्र आणण्याची क्षमता दिसून येते, ज्याला जागतिक मंचावर स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे, असं थरूर यांनी म्हटलं आहे.

चिदंबरम यांनी काय म्हटलं?

दरम्यान, ब्रिक्स परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पी.चिदंबरम यांनी म्हटलं की, गेल्या दोन-तीन शिखर परिषदांमधून कोणतेही महत्त्वपूर्ण किंवा ठोस फायदे किंवा परिणाम दिसून आलेले नाहीत. चिदंबरम म्हणाले की,”या परिषदेला किती पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहत आहेत, याची मला कल्पना नाही. मला वाटत नाही की गेल्या दोन-तीन ब्रिक्स परिषदांतून काही ठोस निष्पन्न झालं आहे.”

भाजपाने काय प्रत्युत्तर दिलं?

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी गुरुवारी चिदंबरम यांच्या विधानांवर टीका केली. “आज जर तुम्ही काँग्रेसकडे पाहिलं, तर भारतात ब्रिक्स शिखर परिषद होत असताना ते एखाद्या ‘नाराज फुफा’प्रमाणे त्याला विरोध करत आहेत. याचं कारण असं की काँग्रेसला माहित आहे की, जेव्हा-जेव्हा देशाची प्रगती होते किंवा भारताचा अभिमान वाढवण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस पक्ष नेहमीच त्याला विरोध करतो.”