BRICS Summit 2026 : यंदाची १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडत आहे. या ब्रिक्स परिषदेसाठी अनेक देशांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या ‘ब्रिक्स परिषदे’साठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ११ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल झाले, तर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे देखील भारतात दाखल होणार आहेत. या बैठकीदरम्यान विविध देशांच्या अध्यक्षांबरोबर पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. त्यामुळे यंदा भारतात होत असलेली ही ‘ब्रिक्स परिषद’ केवळ ‘ब्रिक्स’च्या चौकटीपुरती मर्यादित न राहता भारत आणि इतर अनेक देशांमधील संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवरच BRICS Summit 2026 नेमकं काय आहे? या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’त कोणते देश सहभागी होणार आहेत? या परिषदेत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे? कोणत्या देशांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

यंदाच्या ‘ब्रिक्स’परिषदेतून काय संदेश दिला जाणार?

यंदा १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ भारतात होत आहे. २०२६ च्या या ब्रिक्स परिषदेचा यजमान भारत असल्याने सध्या भारतावर मोठी जबाबदारी आहे. ही ‘ब्रिक्स’ परिषद नवी दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेली आहे. यंदाच्या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी ‘बिल्डिंग रेझिलन्स अँड इनोव्हेशन फॉर कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी’ हे घोषवाक्य घेण्यात आलेलं आहे. यामधून जनकेंद्रित आणि मानवतेला प्राधान्य देणारा दृष्टिकोन अवलंबण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे.

भारतासाठी ही ब्रिक्स परिषद का महत्त्वाची आहे?

रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिका-इराण युद्ध यामुळे सध्याच्या काळातील बदलेले जागतिक राजकारण आणि त्यामुळे जागतिक व्यापारावर होणारा परिणाम या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली ही १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद महत्त्वाची मानली जात आहे. या दरम्यान विविध देशांच्या प्रमुखांबरोबर द्विपक्षीय संबंधांसाठी पंतप्रधान मोदी हे चर्चा करण्याची शक्यता आहे.

तसेच सहकार्य व जागतिक हवामान बदल अशा विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत जागतिक मंचावर आपलं स्थान वाढवण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा वापर करत आहे. अनेक व्यासपीठांद्वारे भारत जागतिक स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. त्यामुळे ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी यावेळी भारताकडे असल्याने याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

‘ब्रिक्स’निमित्त मोदी, जिंगपिंग व पुतिन एका व्यासपीठावर

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारत दौर्‍यावर येणार आहेत. दिल्लीमध्ये होणार्‍या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांचा सात वर्षांनंतर होणारा हा पहिलाच भारत दौरा आहे. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेनिमित्त मोदी, जिंगपिंग व पुतिन हे तिघे एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

‘ब्रिक्स’बाबत थोडक्यात महत्वाची माहिती

-१२-१३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत ‘भारत मंडपम’ येथे या शिखर परिषदे होणार आहे. या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. या परिषदेला ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देशांचे नेते उपस्थित राहतील. यामध्ये रशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, यांच्यासह आदी देशांचा समावेश आहे. सहकार्य बळकट करणं आणि सामायिक हिताच्या जागतिक व प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणं, हे प्रमुख मुद्दे या ब्रिक्समध्ये मुख्य असतील. याआधी भारताने या ब्रिक्स परिषदेचं २०१२, २०१६ आणि २०२१ मध्ये अध्यक्षपद भूषवलं होतं.

‘ब्रिक्स’ची वैशिष्ट्ये काय?

भारत, चीन, ब्राझील आणि रशिया या सारख्या देशांना जागतिक पातळीवरील आर्थिक व राजकीय निर्णयांमध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावता यावी, यासाठी २००९ मध्ये पहिल्यांदा ब्रिक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांतर पुढे त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून या गटाचं ‘ब्रिक्स’ नामकरण करण्यात आलं. या गटाचा विस्तार होऊन त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

भारत आणि चीन या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा या गटामध्ये समावेश होत असल्याने गटाच्या ११ सदस्य देशांची लोकसंख्या चार अब्जापेक्षा अधिक असून ती जागतिक लोकसंख्येच्या जवळपास ५० टक्के आहे. त्यामुळे जागतिक व्यवस्थांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये या देशांना स्थान मिळणं किती महत्त्वाचं आहे, याचा अंदाज येतो. बेलारुस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत.

पहिली ब्रिक्स परिषद कधी झाली?

ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचं एक संघटन तयार करण्यात आलं. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचं वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं.