BRICS Summit 2026: अठरावी ‘ब्रिक्स’ परिषद यंदा नवी दिल्ली येथे होत आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारतात दाखल झाले. तर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंगही लवकरच भारतात येणार आहेत. दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी ब्रिक्स शिखर परिषद पार पडणार आहे. तत्पूर्वी आज पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीत भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक आणि सामरिक सहकार्य अधिक दृञ करण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते.

राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत मंडपम येथे बैठकीसाठी आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना प्राचीन तमिळ अभिजात ग्रंथ ‘तिरुक्कुरल’चा रशियन अनुवाद भेट दिला.

४५ मिनिटांची बैठक

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सुमारे ४५ मिनिटांची द्विपक्षीय बैठक झाली. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु तेल हा या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. रशिया हा भारताच्या सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या पुरवठादारांपैकी एक आहे.

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे हा चर्चेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असण्याची शक्यता आहे. २०२५ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास ७० अब्ज डॉलर्स एवढा होता.

भारतासाठी ही ब्रिक्स परिषद का महत्त्वाची आहे?

रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिका-इराण युद्ध यामुळे सध्याच्या काळातील बदलेले जागतिक राजकारण आणि त्यामुळे जागतिक व्यापारावर होणारा परिणाम या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली ही १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद महत्त्वाची मानली जात आहे. या दरम्यान विविध देशांच्या प्रमुखांबरोबर द्विपक्षीय संबंधांसाठी पंतप्रधान मोदी हे चर्चा करण्याची शक्यता आहे.

पहिली ब्रिक्स परिषद कधी झाली?

ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे संघटन तयार करण्यात आले. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.

‘ब्रिक्स’ची वैशिष्ट्ये काय?

भारत, चीन, ब्राझील आणि रशिया या सारख्या देशांना जागतिक पातळीवरील आर्थिक व राजकीय निर्णयांमध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावता यावी, यासाठी ही परिषद स्थापन करण्यात आली. या गटाचा नंतर विस्तार होऊन त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

भारत आणि चीन या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा या गटामध्ये समावेश होत असल्याने गटाच्या ११ सदस्य देशांची लोकसंख्या चार अब्जापेक्षा अधिक असून ती जागतिक लोकसंख्येच्या जवळपास ५० टक्के आहे. त्यामुळे जागतिक व्यवस्थांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये या देशांना स्थान मिळणे किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.

बेलारुस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत.