BRICS Summit 2026 : दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ नुकतीच पार पडली. या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासह आदी देशांचे प्रमुख नेते या परिषदेत सहभागी झाले होते. मात्र, ब्रिक्स शिखर परिषदेच्या विशेष मेजवानीत (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी ब्रिक्स शिखर परिषदेच्या विशेष मेजवानीत (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून अप्रत्यक्ष टीका केली आहे. “भारतातील ८० टक्के लोक मांसाहारी आहेत”, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यानंतर राहुल गांधींच्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर देत पाहुण्या नेत्यांना दिलेल्या जेवणावरून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे ब्रिक्स परिषदेतील भोजनावरून काँग्रेस आणि भाजपात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी ‘छोले-भटुरे’चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, “माहितीसाठी सांगतो, भारतातील ८० टक्के लोक मांसाहारी आहेत. भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असतं. अगदी माझ्या बहिणीने बनवलेले छोले-भटुरेही तसेच चविष्ट असतात”, असं म्हणत राहुल गांधी यांनी ब्रिक्स परिषदेतील जेवणाच्या मेन्यूवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
किरेन रिजिजू काय म्हणाले?
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान आयोजित विशेष मेजवानीत केवळ शाकाहारी पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. मात्र, यावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला किरेन रिजिजू यांनीही काँग्रेसवर टीका केली. ब्रिक्स देशांच्या नेत्यांना दिलेल्या जेवणावरून काँग्रेस पक्ष विनाकारण मुद्दा बनवत असल्याचं रिजिजू म्हणाले आहेत.
“ब्रिक्स देशांच्या नेत्यांना दिलेल्या जेवणाच्या मेन्यूवरही काँग्रेस पक्ष राजकारण करत आहे. यावर माझा विश्वासच बसत नाही. आमच्या पाहुण्यांनी भारतीय शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. हे जेवण चवदार आणि विविध प्रादेशिक परंपरांमुळे पोषक घटकांनी समृद्ध होतं”, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.
BRICS Summit | Menu of the gala dinner hosted by Prime Minister Narendra Modi at Bharat Mandapam in Delhi pic.twitter.com/WSQnxIG0hZ
— ANI (@ANI) September 12, 2026
‘गाला डिनर’मध्ये खास काय होतं?
दिल्लीत दोन दिवस चाललेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान ब्रिक्स देशांच्या प्रमुख नेत्यांसाठी खास जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जेवणाच्या मेन्यूमध्ये खांडवी मिल-फ्युल, खुंब गलोटी, पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, गाजर-बीन्स पोरियाल आणि मिलेट पुलाव यासह आदी पदार्थांचा समावेश होता. तसेच गोड पदार्थांमध्ये जलेबीसोबत पुरानी दिल्लीची फ्रूट क्रीम आणि शाहतूत फिरणीचा समावेश होता.
दरम्यान, ब्रिक्स परिषदेदरम्यान झालेल्या या ‘गाला डिनर’मधून परदेशी पाहुण्यांसमोर भारताची सांस्कृतिक व खाद्यसंस्कृती मांडण्याचा हा एक प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या मेजवानीच्या मेन्यूमध्ये मांसाहारी पदार्थ वगळण्यात आल्याच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी खोचक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्ष टीका केली.
