नवी दिल्ली : ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुमारे १५ हजारहून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या २०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दिल्ली बंद राहणार नसली तरी, मात्र ‘व्हीव्हीआयपीं’च्या ताफ्यांच्या हालचालींच्या वेळी काही मार्गांवर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येईल.

परदेशी प्रतिनिधींच्या विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि तेथून परिषदस्थळ तसेच इतर नियोजित ठिकाणांपर्यंतच्या प्रवासासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारत मंडपम येथे बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून प्रवेश नियंत्रण आणि देखरेख व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. परदेशी प्रतिनिधींची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी दिल्ली पोलिसांनी शेजारील राज्यांतील सुरक्षा यंत्रणांशीही समन्वय साधला असून गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे. 

या परिषदेनिमित्त सुमारे ४ हजार ८०० वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. परिषदेच्या दोन दिवसांच्या काळात दिल्ली मेट्रोची सेवा सुरू राहणार असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही स्थानकांचे प्रवेश किंवा बाहेर पडण्याचे मार्ग तात्पुरते बंद केले जाऊ शकतात. शहरातील बससेवाही सुरू राहील मात्र, काही मार्ग प्रतिबंधित असतील. रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब सेवा सुरू राहतील. मात्र त्यांच्या प्रतिबंधित भागांमधील प्रवेशावर निर्बंध असतील.

‘ब्रिक्स’ परिषेदेसाठी व्हीव्हीआयपींची मोठी ये-जा असेल. एका दिवसात ८० किंवा त्याहून अधिक उच्च-सुरक्षा वाहतुकीची शक्यता आहे. यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण, मार्गावरील प्रवेशबंदी आणि सुरक्षा समन्वय करावा लागणार असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

परिषदेत डिजिटल चलनावर चर्चा?

सदस्य देशांमध्ये व्यापारासाठी ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ सुरू करण्याची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ब्रिक्स’ सदस्य देशांची अधिकृत डिजिटल चलने जोडण्याचा प्रस्ताव समोर ठेवल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने जानेवारीत दिले होते. या परिषदेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालयाने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने या बाबत पाठविलेल्या ई-मेलला उत्तर दिले नाही.