नवी दिल्ली : ‘ब्रिक्स शिखर परिषदे’साठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शनिवारी भारत दौर्‍यावर येणार आहेत. दिल्लीमध्ये होणार्‍या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठकही होण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांचा सात वर्षांनंतर होणारा हा पहिलाच भारत दौरा असल्याने परिषदेदरम्यान होणारी मोदी व जिनपिंग यांची भेट केवळ ‘ब्रिक्स’च्या चौकटीपुरती मर्यादित न राहता भारत-चीन संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.

जागतिक राजकारणातील बदलते सत्तासमीकरण, अमेरिका-चीन व्यापार आणि सामरिक तणाव, युक्रेन युद्ध तसेच ‘ग्लोबल साऊथ’च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर १८वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबर रोजी भारत मंडपम् येथे होणार्‍या या परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी मोदी व पुतिन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे रशियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आता मोदी व जिनपिंग यांच्यातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

ब्रिक्स शिखर परिषदेनिमित्त मोदी, जिंगपिंग व पुतिन हे तिघे एकाच व्यासपीठावर असतील. या दोन्ही प्रबळ देशांच्या प्रमुखांची मोदींशी होणार्‍या चर्चांमुळे दिल्लीतील या परिषदेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जिनपिंग यांच्या भारत दौर्‍याची अधिकृत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भारत दौर्‍यासंदर्भातील अनिश्चितता संपुष्टात आली.

मोदी-जिनपिंग द्विपक्षीय भेटीकडे विशेष लक्ष

– मोदी आणि क्षी जिनपिंग यांची शनिवारी ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षांत संबंधांतील तणाव कमी करण्यासाठी काही पावले उचलली असली तरी सीमाप्रश्न अद्याप कायम आहे.

– २०२० मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले होते. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये लडाखमधील तणाव कमी करण्याबाबत दोन्ही देशांत झालेल्या चर्चेनंतर उच्चस्तरीय संवाद पुन्हा सुरू झाला.

– मोदी आणि जिनपिंग यांची यानंतर विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भेट झाली असली तरी द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे दिल्लीतील संभाव्य द्विपक्षीय बैठकीत सीमा प्रश्न, व्यापार, गुंतवणूक, दुर्मिळ खनिजे, पुरवठा साखळी आणि द्विपक्षीय संबंध या विषयांवरील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

पुतिन-मोदी भेटीलाही महत्त्व

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही ब्रिक्स परिषदेसाठी दिल्लीत येणार असून, पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय बैठक होईल, अशी माहिती गुरुवारी ‘क्रेमलिन’ने सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी दिली. भारत-रशिया संबंधांमध्ये संरक्षण, अणुऊर्जा, आणि युक्रेन युद्ध या प्रमुख विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताने युक्रेन-रशिया यांच्यातील संघर्षावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोदी-पुतिन चर्चेत युक्रेन युद्धासंदर्भातील मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. ब्रिक्स परिषदेत पुतिन इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबरही बैठक घेणार आहेत, असे वृत्त ‘टिएएसएस’ने दिले आहे. 

‘ग्लोबल साऊथ’ अधिक बळकट

‘ब्रिक्स’चा वापर कोणत्याही एका देशाच्या विरोधात गटबाजी करण्यासाठी केला जात नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. एकल वर्चस्ववादी जागतिक व्यवस्था निर्माण होण्यापेक्षा बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था असली पाहेज आणि त्यासाठी ब्रिक्स हे प्रमुख व्यासपीठांपैकी एक असल्याची भूमिका ब्रिक्स सदस्य देशांनी घेतली आहे मात्र, ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज अधिक प्रभावी करण्यादृष्टीने या परिषदेतील चर्चांना महत्त्व असेल. या सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्य, पुरवठा साखळीला मजबुती, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिन-टेक, हवामान बदल आणि हरित वित्तपुरवठा या विषयांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. एका बाजूला चीन आणि रशियाबरोबरचे संबंध, दुसर्‍या बाजूला अमेरिका आणि पाश्चात्य देशांशी वाढते सहकार्य, तर तिसर्‍या बाजूला ‘ग्लोबल साऊथ’मध्ये नेतृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर समतोल राखण्याचे आव्हान भारतासमोर असेल.

११ सदस्य देश, भागीदार आणि निमंत्रित देश

ह्यब्रिक्सह्णमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या ११ देशांचा समावेश आहे. याशिवाय, भागीदार देश आणि निमंत्रित देशांचे प्रतिनिधीही परिषदेत सहभागी होतील.