BRICS Summit New Delhi: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी शुक्रवारी ब्रिक्स बिझनेस फोरमच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य, सुरक्षित व्यापार यावर भर दिला. डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या ब्रिक्सच्या प्रयत्नांवर अमेरिकेकडून नेहमीच टीका करण्यात आलीय. अशात ब्रिक्समधील नेत्यांची वक्तव्ये चर्चेत आली आहेत.

पंतप्रधान मोदींचा सागरी वाहतूक आणि सुरक्षेवर भर

ब्रिक्स परिषदेच्या माध्यमातून सध्याच्या जागतिक वित्तीय व्यवस्थेला मजबूत पर्याय निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल स्पष्ट संदेश गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक व्यापारासाठी आवश्यक सुरक्षित सागरी मार्ग आणि वाहतुकीवर भर दिला. तसेच, भारत सागरी वाहतूक स्वातंत्र्य आणि खलाशांच्या सुरक्षेचा समर्थक असल्याचे मत मोदींनी मांडले. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाली आहे. याचा व्यापारावर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले आहे.

“सागरी मार्ग सुरक्षित असतील, वाहतुकीचे मार्ग खुले राहतील आणि खलाशी सुरक्षित असतील, तरच जागतिक व्यापाराची प्रगती शक्य आहे. म्हणूनच भारत सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि खलाशांच्या सुरक्षेचा समर्थक आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आर्थिक परिस्थिती बदलतेय – पुतिन

पुतिन यांनी जागतिक अर्थव्यवस्था विविध बदलांमधून जात असल्याचे मत नोंदवले. “२० व्या शतकाच्या उत्तरार्धात विकासाला चालना देणाऱ्या पारंपरिक आर्थिक शक्तींची जागा आता उदयोन्मुख अर्थव्यवस्था घेत आहेत”, असे पुतिन म्हणाले. प्रस्थापित अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा, तांत्रिक व वैज्ञानिक प्रगती अशी बलस्थाने असली तरी जागतिक आर्थिक परिस्थिती बदलत आहे यावर पुतिन यांनी भर दिला. “जग सतत बदलत असते”, असे पुतिन ब्रिक्समध्ये बोलताना म्हणाले.

राष्ट्रीय चलनांच्या वापरावर भर देण्याची इराणची मागणी

इराणचे अध्यक्ष पेझेश्कियन यांनी प्रमुख चलनांवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत भाष्य केले. ब्रिक्स सदस्य देशांमधील व्यापारात राष्ट्रीय चलनांचा अधिक वापर करण्याचे आवाहन पेझेश्कियन यांनी केले. “सदस्य देशांमधील व्यापारामध्ये राष्ट्रीय चलनांचा वापर वाढवणे महत्वाची गोष्ट आहे. यासाठी जोखीम आणि व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक साधनांची स्थापना करणेही गरजेचे आहे,” असे पेझेश्कियन म्हणाले. “सध्याची वित्तीय प्रणाली काही मोजक्या चलनांवर केंद्रित असल्यामुळे राजकीय अनिश्चिततेला बळी पडू शकते” असेही ते पुढे म्हणाले.

डॉलरचे महत्व आणि ट्रम्प यांचा इशारा

डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या ब्रिक्सच्या प्रयत्नांवर ट्रम्प यांनी टीका केली आहे. अशात ब्रिक्समध्ये या नेत्यांनी केलेली वक्तव्य चर्चेत आली आहेत. डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या ब्रिक्स देशांना १० टक्के शुल्काचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा ट्रम्प यांनी गेल्या वर्षी दिला होता. दरम्यान, ब्रिक्स बिझनेस फोरमच्या माध्यमातून दरवर्षी सदस्य देशांचे नेते, मंत्री आणि राष्ट्रप्रमुख व्यापार, गुंतवणूक, वित्त, तंत्रज्ञान आणि विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात.