लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधूने सासरकडच्या मंडळींना दगा दिला. तिने संपूर्ण कुटुंबाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील छोटा पारा भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शनिवारी सकाळी कुटुंबाला जागा आली तेव्हा, वधू दागिने आणि रोख रक्कमेसह गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रविण आणि रियाचे नऊ डिसेंबर रोजी लग्न झाले होते. रिया आझमगडची आहे. ७० हजार रुपये रोख रक्कम आणि तीन लाखाचे दागिने घेऊन रिया घरातून पसार झाली अशी माहिती पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी दिली.तपास सुरु असून लवकरच या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल असे श्रीवास्तव यांनी सांगितले. पोलीस आता टिंकूचा शोध घेत आहेत. त्यानेच हे लग्न जुळवून आणले होते. लग्नानंतर टिंकू नववधूसह तिच्यासोबत सासरी आला होता.

“मुलाच्या लग्नावर आम्ही चार लाख रुपये खर्च केले. आझमगडमध्ये हे लग्न झाले. या लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्या टिंकूनेही पैसे घेतले होते” असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. “पत्नी अशा प्रकारे माझी फसवणूक करेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. संपूर्ण गावासमोर आमची मान खाली गेली आहे. आम्हाला आर्थिक फटकाही बसला आहे. लवकरात लवकर तिला अटक झाली पाहिजे” अशी मागणी प्रविणने केली.