पीटीआय, नवी दिल्ली

पुराव्यांचा अभाव आणि परस्परविरोधी साक्षी याचा हवाला देत दिल्लीतील राउस ॲव्हेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची लैंगिक छळप्रकरणी आरोपातून सुटका केली. जागतिक अजिंक्यपद पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या बहुचर्चित खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवार यांनी सोमवारी हा निकाल दिला.

भाजपचे माजी खासदार असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्याबरोबरच ‘डब्ल्यूएफआय’चे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांचीही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी लैंगिक छळप्रकरणी झालेल्या आरोपाने जेवढा धक्का बसला होता, तेवढाच धक्का या निकालाने बसला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटूंनी वकिलांना अपील करण्यास सांगितले असून लवकरात लवकर अपील दाखल केले जाईल, असे विनेश फोगट यांनी सांगितले. इन-कॅमेरा (बंद खोलीत) झालेल्या सुनावणीत निकाल सुनावताना न्यायाधीशांनी पुराव्यांचा अभाव, साक्षीदारांच्या विसंगत आणि परस्परविरोधी साक्षी हे कारण नमूद केले, अशी माहिती दोन्ही आरोपींच्या वकिलांनी दिली. सुनावणीदरम्यान प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

न्यायालयाने साक्षीदारांच्या साक्षीत आढळलेली विसंगती, विरोधाभास, असंभाव्यता आणि गुन्ह्यच्या वेळी इतरत्र असणे हे युक्तिवाद मान्य केले आणि ब्रिजभूषण यांची सुटका केली, असे त्यांचे वकील राजीव मोहन यांनी सांगितले. महिला कुस्तीपटूंची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ रिबेका जॉन यांनी बाजू मांडली.

घटनाक्रम

’ दिल्लीच्या न्यायालयाने मे २०२४ मध्ये सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, धमकावणे आणि महिलांच्या विनयभंगाचे आरोप निश्चित केले होते, तर तोमर यांच्याविरुद्ध गुन्हेगारी धमकावणीचे आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने सहा महिला कुस्तीपटूंपैकी एका कुस्तीपटूने केलेल्या तक्रारीतून सिंह यांना दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्यामुळे दोषमुक्त केले होते.

’ त्यानंतर पुढच्या महिन्यात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. पुढे मे २०२५ मध्ये न्यायालयाने अल्पवयीन कुस्तीपटूच्या प्रकरणातील पोलिसांचा केस बंद करण्याचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर इन-कॅमेरा सुनावणीसह हा खटला दोन वर्षांहून अधिक काळ चालला आणि न्यायालयाने २ जुलै २०२६ रोजी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला.

तीन वर्षांपूर्वी संघर्षाला सुरुवात

क्रीडा जगताला हादरवून सोडणारे हे आरोप एप्रलि-मे २०२३ मध्ये समोर आले होते, जेव्हा महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले होते. त्यांनी तत्कालीन ‘डब्ल्यूएफआय’ प्रमुख ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. फोगट यांच्यासह कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया ३६ दिवस चाललेल्या या आंदोलनाचा मुख्य चेहरा होते. या निकालानंतर फोगट आणि पुनिया यांनी त्यांच्या ‘एक्स’वर निवेदन प्रसिद्ध करून लढत राहणार असल्याचे सांगितले. सिंह यांनी अनेक मुलींना धमकावून त्यांची नावे मागे घेण्यास भाग पाडले. असा आरोपही फोगट यांनी या वेळी केला आहे.

मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की, जर आरोप खरे ठरले तर मी स्वत:ला फाशी घेईन. आज माझी सुटका झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. ही माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. – ब्रिजभूषण सिंह, माजी अध्यक्ष, ‘डब्ल्यूएफआय’

सुरुवातीपासूनच संपूर्ण प्रशासन, सरकार आणि यंत्रणा ब्रिजभूषण यांना वाचवण्यात गुंतली आहे. न्यायालयाने त्यांना दोषी न ठरवल्यामुळे आम्हाला तीव्र दु:ख झाले आहे. मात्र, आम्ही अद्याप आशा सोडलेली नाही आणि आमचा लढा सुरूच राहील. – विनेश फोगट, तक्रारकर्ती कुस्तीपटू