Brijbhushan Sharan Singh Acquitted: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची गेल्या आठवड्यात निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तता करताना दिल्ली न्यायालयाने सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप खोटे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे आरोप एका, “मोठ्या षडयंत्राचा भाग असून ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येते,” असेही न्यायालयाने म्हटले आहे. खटला सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी, दिल्ली न्यायालयाने पुराव्या अभावी उत्तर प्रदेशचे माजी भाजपा खासदार सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाचे चे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निर्दोष मुक्त केले.
न्यायालयाने काय म्हटले?
“पीडितांनी दिलेला जबाब सरकारी वकिलांचा दावा खोटा ठरवतो सर्व आरोप खोटे व बनावट असल्याचे दाखवून देतो. हे एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत आरोपींविरुद्ध रचले गेले आहेत आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येते; हे सांगायला मला कोणतीही संकोच वाटत नाही,” असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी नोंदवले. आरोपीविरोधात महादेव अकॅडमीच्या प्रशिक्षकांद्वारे आणि दोन सरकारी साक्षीदारांमार्फत कट रचण्यात आला असावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
ऑलिम्पिक वेळच्या घटनेवर भाष्य
न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबात आढळलेल्या विसंगती, तारखा, पुराव्यांवर बोट ठेवले. न्यायालयाने एका ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान मंगोलियात घडलेल्या कथित घटनेवरही भाष्य केले. कथित घटनेची वेळ आणि ठिकाणाबाबत तक्रारदाराच्या जबाबात महत्त्वपूर्ण विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले. “पहिल्यांदा ही घटना २०१५ मध्ये तुर्कस्तानमध्ये घडल्याचे सांगण्यात आले. नंतर ती २०१६ मध्ये मंगोलियात घडल्याचे सांगितले”, असे न्यायालयाने म्हटले. ती घटना कोणत्या देशात आणि कोणत्या वर्षी घडली यातच विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
उशीरा तक्रारीवर बोट
“आंदोलन करण्यापूर्वी तक्रारदारांपैकी एकानेही लैंगिक शोषणाचा कोणताही आरोप केला नव्हता आणि लैंगिक शोषणाचा सामना केलेल्या एकाही महिला कुस्तीपटूचे नाव त्यात नमूद केले नव्हते”, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. “सर्व पीडितांनी केलेल्या आरोपांमध्ये साधर्म्य असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले. त्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये पीडिता आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात महत्त्वाच्या विसंगती होत्या”, असेही न्यायालयाने म्हटले आहे. “तक्रारी खूप उशिरा दाखल करण्यात आल्याचे सांगत आरोप अपूर्ण, सराव केलेले आणि आधीच पेरल्यासारखे वाटतात”, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
