वंदे भारत योजनेत भारत, अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी आणले जाईल, कारण अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने ताब्यात घेतल्याने तेथे कठीण परिस्थिती आहे, असे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सांगितले.

वंदे भारत मोहीम गेल्या वर्षी करोना काळात परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आली होती. भारत सरकार अफगाणिस्तानातील नागरिकांना वंदे भारत मोहिमेत मायदेशी आणणार असून एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने यात वापरली जाऊ शकतील. मंगळवारी शाजापूर येथे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून नागरिकांना परत आणण्यास शुक्रवारीच सुरुवात केली असून तीन दिवस ही प्रक्रिया चालू आहे.

काबूल विमानतळावर गोळीबाराचे आवाज आल्यानंतर वैमानिकांना धोक्याची सूचना मिळाली होती. त्यामुळे काबूलचे हवाई क्षेत्र काही काळ बंद होते. त्यामुळे सोमवारी या मोहिमेत अडथळे आले. त्यानंतर हवाई दलाचे विमान पाठवून भारतीयांना माघारी आणण्यात आले. अफगाणिस्तानातील प्रत्येक भारतीयाला वंदे भारत मोहिमेअंतर्गत मायदेशी आणल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देवास जिल्ह्यातून सिंदिया यांनी मंगळवारी सकाळी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली नंतर रात्री ते शाजापूर येथे आले.