बीजिंग : ब्रिटन आणि चीनने गुरुवारी सर्वसमावेशक सामरिक भागीदारीचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे तयार झालेल्या जागतिक अस्थिरतेला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी अप्रत्यक्षरीत्या अधिक दृढ संबंधांवर भर दिला.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात गुरुवारी बीजिंगमध्ये बैठक झाली. दोघांमध्ये नियोजित वेळेपेक्षा दुप्पट वेळ, ८० मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट नाव घेतले नाही. पण, चर्चेचा रोख अमेरिकेमुळे बदलणार्या जागतिक स्थितीकडेच होता.
गेल्या आठ वर्षांत चीनला भेट देणारे स्टार्मर हे ब्रिटनचे पहिलेच पंतप्रधान आहेत. ‘हवामान बदल, जागतिक स्थिरतेसारख्या मुद्द्यांवर एकत्र काम करणे हे सध्याच्या आव्हानात्मक काळात खर्या अर्थाने गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमच्यातील संबंध दृढ करी आहोत,’ असे वक्तव्य स्टार्मर यांनी जिनपिंग यांच्याशी बोलताना केले.
जिनपिंग म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत चीन-ब्रिटन संबंध फारसे चांगले नव्हते. असे संबंध दोन्ही देशांच्या हिताचे नव्हते. सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या आव्हानानुसार चीन आणि ब्रिटनमध्ये चर्चा अधिक मजबूत रीतीने होणे गरजेचे असून, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी सहकार्यामध्येही वाढ करणे गरजेचे आहे.’
व्हिएतनामशी संबंधही सामरिक स्तरावर हनोई : व्हिएतनाम आणि युरोपीय संघाने गुरुवारी त्यांच्यातील संबंध सर्वोच्च राजनैतिक स्तरावर म्हणजेच सर्वसमावेशक सामरिक भागीदारी स्तरावर नेले. दोन्ही देशांमध्ये व्यापारवृद्धी आणि अमेरिकेच्या आयातशुल्काच्या धोरणामुळे बिघडलेली जागतिक अर्थपुरवठा साखळी योग्य दिशेने नेण्यासाठी हे संबंध दृढ करण्यात येत आहेत. युरोपीय संघाचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा यांनी ही माहिती दिली.

