ब्रिटनने निश्चित केलेल्या करोनाविषयक नियमांवर जयराम रमेश व शशी थरूर या माजी मंत्र्यांनी सोमवारी टीका केली. या नियमांना ‘वंशवादाचा वास येतो’, असे रमेश म्हणाले. या नियमांनुसार, कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्या भारतीयांनाही लस न घेतलेले मानले जात आहे.

या निर्बंधांमुळे आपण दि केंब्रिज युनियन डिबेटिंग सोसायटी आणि ‘दि बॅटल ऑफ बिलाँगिंग’ या आपल्या पुस्तकाच्या ब्रिटन आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातून माघार घेतली, असे थरूर यांनी सांगितले.

इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय प्रवासविषयक नियमांनुसार प्राधिकृत करण्यात आलेल्या लशी ज्यांनी घेतलेल्या नाहीत व ज्यांच्याजवळ तशी प्रमाणपत्रे नाहीत, अशा भारतीयांसह इतर प्रवाशांना लसीकरण न झालेले मानले जात आहे. अशा प्रवाशांना प्रवासपूर्व चाचणी, इंग्लंडमध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्या व आठव्या दिवशी पीसीआर चाचणी आणि प्रवेशानंतर १० दिवसांपर्यंत दिलेल्या पत्त्यावर स्व-विलगीकरण या बाबी नियमांनुसार बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

‘कोव्हिशिल्ड ही लस मुळात ब्रिटनमध्ये विकसित करण्यात आली आणि पुण्याच्या सीरम इन्स्ट्यिूटने ती त्या देशालाही पुरवली हे लक्षात घेता हे निर्बंध विचित्र आहेत’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केले. थरूर यांनीही ट्विटरवर त्यांचे समर्थन केले.