Ex-Prince Andrew Arrested : ब्रिटनच्या राजघराण्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटनच्या राजघराण्याकडे जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय राजघराणं म्हणून पाहिलं जातं. पण मागील काही महिन्यांपासून या राजघराण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद अक्षरशः चव्हाट्यावर आला होता.

त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांना आज यूके पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. माजी प्रिन्स अँड्र्यू यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी यूके पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वृत्तानुसार, माजी प्रिन्स अँड्र्यू यांना आज सकाळी ८ वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेवेळी यूके पोलीस साध्या वेशात आले होते. आता पुढील चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अमेरिकन प्रशासनाने जाहीर केलेल्या जेफ्री एपस्टीन फाईल्समध्येही माजी प्रिन्स अँड्र्यू यांचं नाव आल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता माजी प्रिन्स अँड्र्यू यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अँड्र्यू यांची राजघराण्यातून हकालपट्टी

ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांची काही महिन्यांपूर्वी राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली होती. अँड्र्यू यांच्याकडून त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या. तसेच ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेसमधून प्रिन्स अँड्र्यू यांना बाहेर काढण्यात आलं होतं.

बकिंगहॅम पॅलेसने या संदर्भात एक निवेदन जारी केलं होतं. त्या निवेदनात म्हटलं होतं की, “ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे त्यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांच्या उर्वरित सर्व पदव्या काढून घेण्यात येत आहेत आणि त्यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात येत आहे. तसेच ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी प्रिन्स अँड्र्यू यांच्या सर्व पदव्या आणि त्यांचा सन्मान काढून टाकण्याच्या संदर्भातील सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली आहे”, असं बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटलं होतं.

अँड्र्यू आता राजकुमार राहिले नाही

“प्रिन्स अँड्र्यू हे आता फक्त अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील, म्हणजे ते आता राजकुमार राहिले नाहीत. तसेच ते आता त्यांच्या पर्यायी खासगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जाईल”, असं निवेदनात म्हटलं होतं.