एपी, लंडन
ब्रिटनमधील अविवाहित मातांनी आपले मूल दत्तक देण्यासाठी द्यावे यासाठी सरकारने दबाव टाकल्याबद्दल पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गुरुवारी औपचारिकपणे माफी मागितली. स्टार्मर यांनी संसदेत याबाबत क्षमायाचना करताना, हा ब्रिटनच्या इतिहासावरील कलंक असल्याचे नमूद केले.
ब्रिटन प्रशासनाने १९४९ ते १९७६ या कालावधीत राबवलेल्या दत्तक धोरणामुळे हजारो अविवाहित मातांची मुलांपासून ताटातूट झाली होती. या जवळपास २७ वर्षांच्या कालावधीत इंग्लंड आणि वेल्समधील अंदाजे अविवाहित मातांची एक लाख ८५ हजार मुले दत्तक देण्यात आली होती. मूल दत्तक देण्यासाठी या महिलांवर दबाव टाकणे, फसवणूक आणि धाकदपटशा यासारखे मार्ग अवलंबले गेले होते, हे सरकारने मान्य करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून लढा देत होते.
स्टार्मर संसदेत म्हणाले, “आपले मूल देऊन टाकण्याशिवाय पर्याय नाही अशी भावना या महिलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, त्यांना धमकावण्यात आले किंवा त्यांची दिशाभूल करण्यात आली होती. आपण कोणालाच नको आहोत, अशी भावना बाळगत त्यांची मुले मोठी झाली आणि तुमच्याविना तुमचे मूल चांगल्या पद्धतीने वाढेल असे मातांना सांगण्यात आले होते.” या धोरणाचा परिणाम झालेल्या सर्वांची आपण मनापासून क्षमा मागतो, असे स्टार्मर म्हणाले.
