ब्रिटनने युरोपिय महासंघात राहावे की बाहेर पडावे, यावरील जनमत जाणण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल आले असून, ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) याच बाजूने कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमधील आघाडीचे माध्यम ‘बीबीसी’ने ब्रेक्झिटच्या बाजूनेच कौल असल्याचे जाहीर केले आहे. बाहेर पडावे या बाजूने ५१.९० टक्के जणांनी मतदान केले. तर ४८.१० टक्के मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याच्या बाजूने मत टाकले. एकूण मतदानापैकी १ कोटी ७४ लाख १० हजार ७४२ मतदारांनी बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले, तर एक कोटी ६१ लाख ४१ हजार २४१ मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याचे बाजूने पसंती दिली. बाहेर पडावे (लीव्ह) आणि युरोपिय महासंघातच राहावे (रिमेन) या दोन्ही बाजूंमधील फरक सातत्याने वाढतच गेला.


मतमोजणीत ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिला गेल्या हळूहळू स्पष्ट होऊ लागल्यानंतर त्याचा जगातील विविध शेअर बाजारांवर परिणाम झाला. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. ब्रेक्झिटचा जगातील विविध देशांच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांनी पर्यायी उपाययोजनांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.
२८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन महासंघामधून ब्रिटनचे संभाव्य एक्झिट म्हणजेच ‘ब्रेक्झिट’ हा केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगासाठी कळीचा मुद्दा बनला. ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (२३ जून) ब्रिटनमध्ये मतदान घेण्यात आले. ब्रिटन ही जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्रेक्झिटच्या बाजूने पूर्णपणे कौल दिला गेल्यास २०१९ मध्ये अधिकृतपणे ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार आहे. दरम्यानच्या काळात या परिवर्तनाचे दूरगामी परिणाम सर्वांनाच पाहायला मिळणार आहेत.