British Couple Auto Rickshaw India to UK : परदेशात फिरायला गेल्यानंतर पर्यटक आठवण म्हणून फ्रिज मॅग्नेट, पोस्टकार्ड किंवा छायाचित्रे घेऊन परततात. मात्र, एका ब्रिटिश जोडप्याने भारतभ्रमंतीची आठवण म्हणून चक्क ऑटो रिक्षाच मायदेशी नेली आहे. हेलन आणि मिक या जोडप्याने भारतात ७५ दिवसांत तब्बल ४ हजार २१८ किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासात त्यांची लाल-काळ्या रंगाची बजाज रिक्षा त्यांची खास साथीदार बनली. त्यामुळे भारत सोडताना ही रिक्षा इथेच ठेवण्याऐवजी त्यांनी ती थेट ब्रिटनला पाठवण्याचा निर्णय घेतला. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियावर या अनोख्या प्रवासाची माहिती शेअर केली आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
‘टिम्मी द टिन कॅन’सोबत ७५ दिवसांची भारतभ्रमंती
हेलन आणि मिक यांनी भारतात प्रवास करण्यासाठी चेन्नईमध्ये नोंदणीकृत असलेली बजाज ऑटो रिक्षा निवडली होती. ‘टिम्मी द टिन कॅन’ असे त्यांनी या रिक्षाचे प्रेमाने नामकरण केले होते. रिक्षाच्या पुढील बाजूला कार्टूनमधील डोळे आणि हसरा चेहरा अशा खास सजावटीमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या रिक्षातून जोडप्याने तब्बल ७५ दिवस भारतातील विविध शहरे, राज्ये आणि पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. या प्रवासात आग्रा आणि ताजमहालसारख्या प्रसिद्ध ठिकाणांचाही समावेश होता. तब्बल ४ हजार २१८ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही रिक्षा त्यांच्या सुट्टीचा केवळ प्रवासाचा पर्याय न राहता खास आठवण बनली.
सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षा ब्रिटनमध्ये दाखल
भारतभ्रमंती संपल्यानंतर जोडप्यासमोर मोठा प्रश्न होता, तो म्हणजे टिम्मीला भारतातच सोडून जायचे की सोबत न्यायचे? अखेर त्यांनी रिक्षा समुद्रमार्गे ब्रिटनला पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रिक्षाने भारतातून ब्रिटनपर्यंतचा प्रवास सुरू केला. सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी टिम्मी लंडनमधील लंडन गेटवे बंदरात दाखल झाली. भारतातील रस्त्यांवर हजारो किलोमीटर धावल्यानंतर आता या रिक्षाने समुद्रमार्गेही हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ‘एक्स’वर या रिक्षाच्या ब्रिटनमधील आगमनाची छायाचित्रे आणि माहिती शेअर केली. “भारतीय तीनचाकी वाहन ब्रिटनच्या दिशेने! भारतीय रस्त्यांपासून ब्रिटिश रस्त्यांपर्यंतचा हा प्रवास किती भन्नाट आहे,: अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ब्रिटनच्या रस्त्यांवर धावण्यासाठी आणखी प्रतीक्षा
टिम्मी ब्रिटनमध्ये सुरक्षित पोहोचली असली, तरी हेलन आणि मिक यांना तिच्यासोबत लगेच रस्त्यावर फिरता येणार नाही. ब्रिटनमध्ये वाहन चालवण्यासाठी आवश्यक स्थानिक कागदपत्रांची पूर्तता आणि तेथील वाहनविषयक नियमांची पूर्तता करणे अद्याप बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांना रिक्षा कायदेशीररीत्या ब्रिटिश रस्त्यांवर चालवता येईल.
