British F-35 jet moved : ब्रिटीश एफ-३५ लढाऊ विमान गेल्या २२ दिवसांपासून तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकून पडले होते, गेल्या महिन्यात या विमानाने येथे आपत्कालीन लँडिंग केले होते. अखेर आज (रविवारी) हे फायटर जेट विमानतळ परिसरातून बाहेर काढण्यात आले.
एफ-३५ जेटची तपासणी करण्यासाठी ब्रिटिश रॉयल एअर फोर्स एअरबस ए४००एम अॅटलसमधून तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम आज तिरुअनंतपुरम विमानतळावर दाखल झाली आहे, एएनआयने यासंबंधीचे वृ्त्त दिले आहे.
दरम्यान एफ-३५ जेट हे हँगरकडे घेऊन जात असतानाचा व्हिडीओ देखील वृत्तसंस्था एएनआयने पोस्ट केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे लढाऊ विमान विमानतळावर एकाच जागी उभे होते.
ब्रिटिश एफ-३५ हे एचएमएस प्रिंस ऑफ वेल्स कॅरिअर ग्रुपचा भाग आहे आणि केरळच्या समुद्र किनार्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर सराव करत होते. हवामान बिघडल्याने आणि इंधन कमी असल्याने त्याला तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: Stranded F-35B British fighter jet being moved to the hangar from its grounded position.
— ANI (@ANI) July 6, 2025
A team of technical experts on board the British Royal Air Force Airbus A400M Atlas arrived at the Thiruvananthapuram International Airport to assess the… pic.twitter.com/bL9pGrJzIs
भारतीय हवाई दलाने याच्या लँडिंगसाठी मदत करत इंधन आणि लॉजिस्टिक मदत देऊ केली होती, मात्र जेव्हा विमान परत घेऊन जाण्याची तयारी केली जात होती तेव्हा त्यामध्ये हायड्रॉलिक फेल्योर असल्याचे आढळून आले, ज्यामुळे टेक-ऑफ आणि लँडिंगमध्ये अडचण येऊ शकत होती.
तीन तंत्रज्ञ असलेल्या रॉयल नेव्हीच्या एका छोट्या टीमने विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु समस्या खूपच गुंतागुंतीची असल्याने त्यांना यश मिळाले नाही. यानंतर ब्रिटिश टीमलाहे विमान हँगरमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव एअर इंडियाकडून देण्यात आला होता, मात्र तो फेटाळण्यात आला, पण मान्सुनच्या पावसाचा जोर वाढल्याने त्यांनी यासाठी परवानगी दिली.
या दरम्यान सोशल मीडियावर एफ-३५ जेटवर भरपूर मीम्स बनवण्यात आल्या. आता हे जेट विमानतळावरून हटवण्यात आले आहे, मात्र ब्रिटिश तंत्रज्ञ किती दिवसात याला हवेत उडण्याइतपत दुरुस्त करू शकतात हे पाहावे लागणार आहे.
फायटर जेटती किंमत किती आहे?
एफ-३५बी लायटनिंग हे जगातील सर्वात प्रगत पाचव्या पीढीचे फायटर जेट आहे. याची किंमत जवळपास ११० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९१५ कोटी रुपये) आहे. यामध्ये STOVL (शॉर्ट टेक-ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग)क्षमता देखील आहे आणि हे लहान डेक किंवा मर्यादित जागा असलेले बेसवरून देखील उड्डाण करू शकते.