अहमदाबाद : भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी येथे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. अदानी समूहाच्या शांतीग्राम येथील जागतिक मुख्यालयात ही भेट झाली. हे ठिकाण अहमदाबाद शहराबाहेर आहे. या भेटीनंतर अदानी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, गुजरातमधील अदानी समूहाच्या मुख्यालयाला भेट देणारे ब्रिटनचे पहिलेच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे स्वागत करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे. या भेटीत हवामान आणि शाश्वत विकासाचा कार्यक्रम यांबरोबरच पुनर्वापरयोग्य, स्वच्छ हायड्रोजन आणि अपारंपरिक ऊर्जा यांच्या निर्मितीत योगदान देण्याबाबत चर्चा झाली, याचा आनंद आहे. आम्ही ब्रिटनमधील कंपन्यांच्या सहकार्याने संरक्षण आणि हवाई अवकाश तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रातही काम करणार आहोत.

जॉन्सन आणि अदानी यांनी ऊर्जा वहन, हवामान बदल, हवाई आणि संरक्षण क्षेत्रातील सहयोगाबद्दल तसेच अन्य विषयांवरही चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले. भारत आपल्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावर २०३० पर्यंत ३० हजार कोटी अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक करणार आहे. जॉन्सन-अदानी भेटीत हा चर्चेचा एक मुख्य मुद्दा होता, असे सूत्रांनी सांगितले.  आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हवाई-अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये अदानी समूह आणि ब्रिटिश कंपन्या कोणत्या प्रकारे सहकार्य करू शकतील, यावर दोघांनी चर्चा केली, असे सांगण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे निमंत्रण

अदानी यांनी या भेटीत जॉन्सन यांना लंडनमध्ये २८ जून रोजी आयोजित केलेल्या भारत-ब्रिटन हवामान विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे निमंत्रण दिले. ब्रिटिश सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या चेव्हेिनग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भारतीय युवकांसाठी मदत योजना राबविण्याची घोषणाही अदानी यांनी या वेळी केली.