लंडन : ब्रिटनमधील सत्ताधारी हुजूर पक्षाचे अध्यक्ष नदीम झहावी यांना ऋषी सुनक यांनी रविवारी मंत्रिपद आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्रिपदावरून हटवले.
देशाचे अर्थमंत्री असताना झहावी यांच्यावर लाखो डॉलरची कर फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. झहावी यांना लिहिलेल्या पत्रात सुनक यांनी नमूद केले आहे, की आपल्या कार्यकाळाच्या प्रारंभी सर्व स्तरांवर सचोटी, व्यावसायिक मूल्यपालन व उत्तरदायित्वाचे वचन आपण जनतेस दिले आहे. त्यानुसार मला हे पाऊल उचलावे लागत आहे. झहावी हे ब्रिटिश मंत्रिमंडळात बिन खात्याचे मंत्री होते. नुकत्याच झालेल्या करचुकवेगिरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महसूल आणि सीमाशुल्क विभागांसोबत दंडासह अन्य बाबींत तडजोड केल्याचे उघड झाल्यानंतर मंत्रिपद सोडण्यासाठी झहावींवर प्रचंड दबाव होता. त्यांना हटवण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सुनक यांनी झहावी यांच्या कर प्रकरणांच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले होते.