scorecardresearch

भारत-ब्रिटन सुरक्षा चर्चेत ऋषी सुनक सहभागी; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानविषयक संबंध अधिक दृढ  करण्याची ग्वाही

अमेरिका दौऱ्यानंतर अजित डोवाल ब्रिटनसोबत वार्षिक द्विपक्षीय धोरणात्मक वाटाघाटींसाठी ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत.

british pm rishi sunak
भारत-ब्रिटन सुरक्षा चर्चेत ऋषी सुनक सहभागी

लंडन : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि ब्रिटिश सुरक्षा सल्लागार टिम बारो यांच्यातील चर्चेदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक उपस्थित राहिले. याद्वारे त्यांनी उभय पक्षीय संबंधांना महत्त्व देत असल्याचे संकेत दिले. यावेळी सुनक यांनी सांगितले, की व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये उभयपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर ब्रिटनचा भर आहे.

अमेरिका दौऱ्यानंतर अजित डोवाल ब्रिटनसोबत वार्षिक द्विपक्षीय धोरणात्मक वाटाघाटींसाठी ब्रिटन दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी अमेरिकेत त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्याशी चर्चा केली होती.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी उशिरा यासंदर्भात ‘ट्वीट’ केले. त्यात या बैठकीचा संदर्भ देत नमूद केले आहे, की टिम बारो व डोवाल यांच्यातील भारत-ब्रिटनदरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारस्तरीय संवादात सहभागी होऊन, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विशेष संकेत दिले आहेत. पंतप्रधान सुनक यांनी भारतासोबत व्यापार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाला महत्त्व आहे. सर टीम बारो यांच्या भारतदौऱ्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

 ‘बीबीसी’चा वादग्रस्त वृत्तपट ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’च्या पार्श्वभूमीवर भारत व ब्रिटनमध्ये हा संवाद झाला. भारत सरकारने पक्षपाती प्रचार अशी टीका करून या वृत्तपटावर बंदी घातली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 02:59 IST