पीटीआय, लंडन

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची फेररचना करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना त्यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला आणि माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा नवे परराष्ट्रमंत्री म्हणून समावेश केला. जेम्स क्लेव्हर्ली यांच्याकडील परराष्ट्र खाते काढून त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची, तर डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे डाऊिनग स्ट्रीटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र व्यवहार – मंत्री एस. जयशंकर यांच्याशी मावळते परराष्ट्रमंत्री क्लेव्हर्ली द्विपक्षीय चर्चा करतील, असे नियोजित असतानाच पंतप्रधान सुनक यांनी मंत्रिमंडळ फेररचना केली.  ‘‘सुनक हे सक्षम पंतप्रधान असून कठीण काळात त्यांचे नेतृत्व अनुकरणीय आहे. देशाची सुरक्षितता आणि समृद्धी याबाबतीत मी त्यांना मदत करू इच्छितो’, अशी प्रतिक्रिया कॅमेरून यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा >>>जो बायडेन यांच्या नातीच्या कारवर हल्ला? सिक्रेट एंजट्सकडून गोळीबार, नेमकं प्रकरण काय?

जेम्स क्लेव्हर्ली यांच्याकडील परराष्ट्र खाते काढून ते माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांना देण्यात आले आहे. जून २०१६ मध्ये ब्रेग्झिट सार्वमतात पराभव झाल्यानंतर कॅमेरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी ब्रिटनचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीबाबत सविस्तर चर्चा केली. ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी माजी पंतप्रधान कॅमेरून यांची परराष्ट्रमंत्रीपदी नेमणूक केल्यानंतर काही तासांनी दोन्ही नेत्यांची भेट झाली. ‘‘ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री कॅमेरून यांची भेट घेतली आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. संभाव्य धोरणात्मक भागीदारीबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली,’’ असे जयशंकर यांनी एक्स संदेशात म्हटले आहे.

गृहमंत्री म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. योग्य वेळी मी आणखी काही गोष्टी सांगेन. –  सुएला ब्रेव्हरमन

Story img Loader