BRS Protest Telangana Assembly: तेंलगणात काँग्रेस सरकारविरोधात आज बीआरएस पक्षाने विधानसभेवर मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के.टी रामा राव आणि माजी मंत्री टी. हरीष राव आणि इतर आमदारांना काही काळ ताब्यात घेऊन नंतर सुटका करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनावेळी माजी मंत्री आणि महिला आमदार सबिता इंद्रारेड्डी यांच्या केसांना धरुन पोलिसांनी ओढल्याचा आरोप बीआरएस पक्षाने केला आहे. “काँग्रेस असाच महिलांचा आदर करते का?”, असा सवाल बीआरएसने उपस्थित केला आहे.
BRS कडून व्हिडीओ पोस्ट
भारत राष्ट्र समितीच्या वतीने या घटनेचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. बीआरएसने शेअर केलेल्या व्हिडीओत पोलिस कर्मचारी महिला आमदार आणि माजी मंत्री यांना आंदोलनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, पोलिसांनी इंद्रारेड्डी यांच्या केसांना धरुन पोलिसांनी ओढल्याचा आरोप बीआरएस पक्षाने केला आहे.
काँग्रेसवर टीका
“माजी मंत्री आणि विद्यमान आमदार यांना विधानसभेच्या परिसरात अमानवी वागणूक देण्यात आली. त्या महिला आमदार आहेत विचारही न करता पोलिसांनी त्यांचे केस ओढले. काँग्रेस असाच महिलांचा आदर करते का?”, असे बीआरएसने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बीआरएसचा सरकारविरोधात मोर्चा
तेलंगणात काँग्रेस सत्तेत आहे, सत्तेत आल्यापासून १००० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षाने काँग्रेस सरकारविरोधात मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकारी अध्यक्ष के.टी रामा राव आणि माजी मंत्री टी. हरीष राव, आमदार आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना विधानभवनाच्या आवरात प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी काही काळासाठी के.टी रामा राव आणि टी. हरीष राव यांच्यासह इतरांना ताब्यात घेतले होते. आंदोलनावेळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
केटीआर यांच्याकडून टीका
काँग्रेसचा १००० दिवसांचा कार्यकाळ आणि दिलेली आश्वासने पूर्ण करु न शकल्याच्या विरोधात पक्षाने घोषणाबाजी केली. यापूर्वी केटीआर देखील या विरोधात रस्त्यावर उतरले होते. “काँग्रेस खोटी आश्वासने आणि स्वप्न दाखवून सत्तेत आले. समाजातील सर्व घटकांचा त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यांनी १०० दिवसांत पूर्ण करु असे सांगत ४२० आश्वासनं दिली. एवढेच नव्हे ही आश्वासनं बॉन्ड पेपरवर देण्यात आली. १०० दिवसांत आश्वासने पूर्ण करतो असे सांगितले होते मात्र १००० दिवसांनंतरही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत”, असे केटीआर म्हणाले.
