कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या दिवशीच राजीनामा दिला. यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत उत्सुकता आहे. मात्र येडियुरप्पांच्य या राजीनाम्याने राजकीय परिणाम होण्याबरोबरच त्यांच्या समर्थकांवरही मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळत आहे. चामराजनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने निराश होऊन आत्महत्या केलीय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. या तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. येडियुरप्पांनीही या तरुणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव रवि असं असून तो ३५ वर्षांचा होता. येडियुरप्पा यांनी कन्नडमध्ये ट्विट केलं आहे. “मी राजीनामा दिल्याने रविने आत्महत्या केली ही बातमी माझ्यासाठी फार दु:खद आहे. राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. त्यामुळे एखाद्याने आपले प्राण द्यावे हे कोणत्याप्रकारे स्वीकारता येणार नाही. ज्या दु:खामधून त्याचं कुटुंब जात आहे त्याची कोणत्याही प्रकारे भरपाई करता येणार नाही,” असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

पक्षाचा दबाव नव्हता…

येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर आपण ‘स्वेच्छेने’ हे पद सोडल्याचे सांगितले. ‘दोन महिन्यांपूर्वीच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे ही राजीनाम्याची योग्य वेळ असल्याचे मला वाटले. त्यानुसार मी राज्यपालांकडे माझा राजीनामा सोपवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे’, असे येडियुरप्पा यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावर कुठलाही दबाव नव्हता, तर इतरांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देण्यासाठी आपण स्वत:हूनच हे पद सोडले, असे ते म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत आपण काहीच प्रस्ताव देणार नाही. पक्षश्रेष्ठी ज्याची निवड करतील त्याला मी सहकार्य करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आपण राजकारणात कायम राहणार असून, भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी उद्यापासूनच काम करू, असे येडियुरप्पा यांनी सोमंवारी बोलताना स्पष्ट केले. तुम्हाला राज्यपाल करण्याचा प्रस्ताव आला तर तो मान्य कराल काय, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. सुरुवातीच्या दिवसांत आपल्या मंत्रिमंडळाशिवाय प्रशासन चालवावे लागले, त्यानंतर भीषण पूरपरिस्थिती आणि करोना व्यवस्थापन यांच्या आव्हानाचा सामना करावा लागला हे लक्षात घेता ही दोन वर्षे आपल्यासाठी ‘अग्निपरीक्षेची’ होती, असे येडियुरप्पा म्हणाले.

रस्सीखेच..

येडियुरप्पा पायउतार झाल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण, याबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी, राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, गृहमंत्री बसवराज बोम्मई, महसूलमंत्री आर. अशोक, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण, उद्योगमंत्री जगदीश शेट्टर, खनिकर्ममंत्री मुरुगेश निरानी व आमदार अरविंद बेल्लाड यांची नावे चर्चेत आहेत. अनेक जण इच्छुक असून, मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.