झारखंडच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अतिरेकी आणि गुन्हेगारांच्या संघटित टोळ्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आहे. त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. अलीकडेच अटक करण्यात आलेला सीआरपीएफ जवान अविनाश आणि त्याच्या इतर दोन साथीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांना विकली जाणारी अनेक शस्त्रे देशाच्या सशस्त्र दलांची असल्याचे तपासात समोर आले आहे.

झारखंड एटीएसने संपूर्ण देशात कार्यरत असलेले एक मोठे शस्त्रास्त्र आणि दारूगोळा रॅकेट उघड केले आहे. माओवाद्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याच्या आरोपाखाली बीएसएफच्या एका हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

झारखंड पोलिसांनी अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या १८२ बटालियनमध्ये तैनात जवान अविनाश कुमार उर्फ ​​चुन्नू शर्मा याला शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्या इतर दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. अविनाश हा मूळचा बिहारच्या गया जिल्ह्यातील इमामगंज येथील परासिया गावचा रहिवासी आहे. पुलवामा येथे तैनात असलेला अविनाश कुमार चार महिन्यांपासून कामाच्या ठिकाणी गैरहजर होता. बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील सलीमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेनीपूर गावचा रहिवासी असलेला ऋषी कुमार आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील सिमरी गावचा रहिवासी पंकज कुमार सिंग हे त्याचे अटक केलेले साथीदार आहेत.

या अटक केलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झारखंड एटीएसच्या पथकांनी देशातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्राच्या सीमेवर तिघांना शस्त्रांसह पकडण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार, पंजाबमधील फिरोजपूर येथे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झारखंड एटीएसने बीएसएफचे निवृत्त कॉन्स्टेबल अरुण कुमार सिंग, आणखी तिघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर ते शस्त्रास्त्र आणि दारूगोळा बनवण्याचा कारखाना चालवत असत. तिथे शस्त्रास्त्रे बनवण्यात येत होती. यासाठीचा दारुगोळा फक्त आयुध कारखान्याचा होता.