सीमा सुरक्षा दल अर्थात BSF चे जवान उष्णतेच्या लाटेतही आपल्या सीमांचे रक्षण करत आहेत. उष्णतेची लाट असो, पाऊस असो किंवा थंडीचा कडाका असो कोणत्याही वातावरणात आम्ही सीमेवर सज्ज असतो. आपल्या देशातले लोक शांतपणे झोपू शकतात कारण त्यांच्या मनात हा दृढ विश्वास असतो की सीमेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यामुळे वातावरणात काहीही आणि कितीही बदल झाला तरीही आम्ही सीमेवर उभे असतो. कारण लोकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या विश्वासामुळे लोक शांतपणे झोपू शकतात अशी प्रतिक्रिया एका जवानाने एएनआय या वृतसंस्थेशी बोलताना दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. आपल्या सीमेवरचे जवान मात्र त्याही परिस्थिती आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. देशाच्या जवानांनी कायमच आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण केलं आहे. आता वातावरणात होणारे बदल जरी त्रास देणारे ठरत असले तरीही त्यांची पर्वा न करता जवान देशाच्या सीमांवर उभे आहेत. तापमानात सातत्याने वाढ होते आहे. मात्र त्याची आम्हाला पर्वा नाही कारण आमच्या मनात ही भावना कायम असते की देशातले लोक आपल्यामुळे शांतपणे झोप घेऊ शकतात. अशी प्रतिक्रिया सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाने दिली आहे.