मिझोराममधील एका न्यायालयाने २०१७ मधील एका धक्कादायक गुन्ह्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या दोन जवानांना न्यायालयाने तब्बल ४२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हे दोन्ही जवान सध्या सेवेतून निलंबित आहेत.

मिझोराममधील ऐझॉल जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सिल्वी झोमुआनपुई राल्ते यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने निलंजन दास आणि दिनेश कुमार या दोन सीमा रक्षकांना १२ जून रोजी दोषी ठरवले होते आणि मंगळवारी त्यांच्या शिक्षेचे प्रमाण (Quantum of Punishment) जाहीर केले. याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

गुन्ह्याचे स्वरूप आणि न्यायालयाचा कठोर निर्णय

निलंजन दास (रा. पश्चिम बंगाल) आणि दिनेश कुमार (रा. उत्तर प्रदेश) यांनी १६ जुलै २०१७ रोजी मामित जिल्ह्यातील सिल्सुरी वेस्ट गावाजवळील गसकाटा नदीजवळ या महिलेवर अत्याचार केले होते. त्यांनी केवळ महिलेवर बलात्कार केला नाही, तर तिच्यावर ॲसिडसारखा घातक पदार्थ फेकून तिला गंभीर जखमी केले होते.

न्यायालयाने दोन्ही गुन्हेगारांना वेगवेगळ्या कलमांखाली सामूहिक बलात्कारासाठी २० वर्षांची सक्तमजुरी, गंभीर इजा पोहचवणाऱ्या बलात्कारासाठी १० वर्षांची सक्तमजुरी, ॲसिड हल्ल्यासाठी १२ वर्षांची सक्तमजुरी याप्रमाणे कठोर शिक्षा सुनावली आहे.

एकूण ४२ वर्षांची शिक्षा: न्यायालयाने स्पष्ट केले की या तिन्ही शिक्षा एकापाठोपाठ एक सुरू राहतील, म्हणजेच त्यांना एकूण ४२ वर्षे तुरुंगात काढावे लागणार आहेत. याशिवाय, न्यायालयाने दोन्ही दोषींना प्रत्येकी ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास त्यांना आणखी प्रत्येकी दोन महिने अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागेल.

जवानांची सेवेतून हकालपट्टी होणार

२०१७ मध्ये या घटनेनंतर दोन्ही जवानांना तात्काळ अटक करण्यात आली होती आणि बीएसएफ प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले होते. आता न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यामुळे, या दोन्ही दोषी जवानांना अधिकृतपणे सेवेतून पूर्णपणे बडतर्फ करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले आहे. या कठोर निर्णयामुळे पीडितेला ९ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला आहे. समाज माध्यमांवर या प्रकरणाविषयी मोट्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.