BSNL अर्थातर भारतीय संचार निगम लिमिटेडचे संचालक विवेक बंजल यांचा १९ फेब्रुवारीला प्रयागराज दौरा होता. या दौऱ्याचा प्रोटोकॉल, अर्थात नियमावली व्हायरल झाली होती. ज्यानंतर हा दौरा रद्द झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंजल यांच्या दौऱ्याची नियमावली विचित्र आणि तेवढीच निषेधार्ह होती. आता याच विवेक बंजल यांच्यावर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.

विवेक बंजलना बजावण्यात आली कारणे दाखवा नोटीस

बीएसएनएलचे संचालक विवेक बंजल यांना केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसांत यासंबंधीचं उत्तर मागितलं आहे. विवेक बंजल काय उत्तरं देतात त्यावर त्यांच्यावर होणारी कारवाई अवलंबून असणार आहे.

विचित्र प्रोटोकॉलचं प्रकरण नेमकं काय आहे?

१९ फेब्रुवारीला विवेक बंजल यांचा प्रयागराज दौरा होता. या दौऱ्यासाठी एक नियमावली जाहीर करण्यात आली होती. या नियमावलीत बंजल यांच्यासाठी मिनिटामिनिटांची योजना तयार करण्यात आली होती. विवेक बंजल किती वाजता येणार? कुठे जाणार? कसे जाणार? प्रयागराज संगमावर स्नान कधी करणार? स्नानानंतर कुठला टॉवेल वापरणार, कुठली अंडरवेअर वापरणार? कुठे जेवण करणार? अशा सगळ्या गोष्टींसाठी ५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियमावली सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि बंजल यांना दौरा रद्द करावा लागला. मात्र आता हे प्रकरण बंजल यांच्या अंगाशी आलंय. बंजल यांना अशी विचित्र नियमावली का केलीत? त्यासाठी ५० अधिकाऱ्यांना कामाला का लावणार होतात? याबाबत येत्या सात दिवसांत उत्तर द्यावं लागणार आहे.

प्रोटोकॉल व्हायरल झाला आणि…

बंजल यांच्यासाठी जो कार्यक्रम आखण्यात आला होता त्यातली नियमावली आणि छोटे छोटे सगळे संदर्भ हे व्हायरल झाले. एवढंच नाही तर या प्रोटोकॉल्सचं तंतोतंत पालन झालं पाहिजे म्हणून ५० अधिकाऱ्यांनाही कामाला लावण्यात आलं होतं. टॉवेलपासून अंडरवेअरपर्यंत सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मिळतील, कुठलंही सामान मागे राहणार नाही यासाठीची ही नियमावली होती. मात्र ही नियमावली व्हायरल झाल्यानंतर बंजल यांनी दौरा रद्द केला. पण आता केंद्र सरकारने या प्रकरणात बंजल यांना नोटीस बजावली आहे.

BSNL Director Vivek Banjal News
विवेक बंजल यांचा व्हायरल झालेला प्रोटोकॉल (फोटो-सोशल मीडिया)

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया काय म्हणाले?

“विवेक बंजल यांनी जे काही केलं ते वर्तन आणि ती नियमावली नियमबाह्य होती. आम्ही त्यांना शो कॉज नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत त्यांनी या प्रकरणी उत्तर दिलं पाहिजे.”

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

विवेक बंजल यांच्या दौऱ्याची नियमावली जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा सगळा नवाबी थाट कशासाठी असं विचारत बंजल यांच्यावर टीका केली होती. दरम्यान टीकेचा भडीमार झाल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला होता. BSNL चे जनसंपर्क अधिकारी आशिष गुप्ता यांनी दौरा रद्द झाल्याची माहिती दिली होती. तसंच त्यांनी हे देखील स्पष्ट केल होतं की दौरा रद्द झाल्याने प्रोटोकॉलचा काही प्रश्नच येत नाही. मात्र या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. तसंच बंजल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.