सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लॅन सादर केले आहेत. तुर्तास हे प्लॅन काही ठराविक सर्कल पुरतेच मर्यादित आहेत. कंपनीने २५८ रूपये, ३७८ आणि ५४८ रूपयांचे तीन नवीन प्लॅन आणले आहेत. सध्या हे प्लॅन पंजाब आणि गुजरात सर्कलपुरतेच मर्यादित ठेवले आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर फक्त या दोन सर्कलमध्येच हा प्लॅन दिसत आहे. सर्कलनुसार या प्लॅनचे दर बदलले जातील असे सांगितले जात आहे.

काय आहे प्लॅन:
सर्वात कमी किमतीचा म्हणजे २५८ रूपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २२० रूपयांचा टॉकटाइम, ११० फ्री ऑन नेट व्हाइस कॉलिंग (बीएसएनएल ते बीएसएनएल) मिळेल. या पॅकची वैधता ३० दिवस असेल. तर ३७८ रूपयांच्या कॉम्बो पॅकमध्ये ४ जीबी प्रतिदिवस डेटा मिळेल. एका दिवसांत ४ जीबीची मर्यादा संपल्यानंतर ८० केबीपीएस वेग मिळेल. या पॅकमध्ये ऑन नेट अमर्यादित कॉल आणि ऑफ नेटसाठी ३० मिनिट प्रतिदिन दिले जातील. या पॅकचा कालावधीही ३० दिवस इतका असेल.

५४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवस म्हणजेच ३ महिन्यांसाठी ५ जीबी डेटा दररोज दिला जाईल. ही मर्यादा संपल्यानंतर ८० केबीपीएस डेटा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये व्हाइस कॉलिंगची सुविधा नसेल.

प्रत्येक सर्कलमध्ये या प्लॅनची किंमत वेगवेगळी असेल. उदाहरणार्थ २५८ रूपयाचा प्लॅन गुजरातमध्ये २५९ रूपयांना मिळेल. त्याचबरोबर ३७८ रूपयांच्या प्लॅनची किंमत ३७९ रूपये असेल. इतकेच नव्हे तर ५४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये गुजरातच्या ग्राहकाला ५ जीबी तर पंजाबच्या ग्राहकाला ४ जीबी डेटा मिळेल. परंतु, या प्लॅनची व्हॅलिडिटी सर्व सर्कलमध्ये सारखीच असेल.