बीएसएनएलचे संचालक विवेक बन्झल यांच्या नियोजित प्रयागराज दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणि वादात सापडलेल्या या दौऱ्यावर आता सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या अधिकाऱ्याच्या दोन दिवसांच्या खर्चिक आणि ‘शाही थाटातील’ दौऱ्यावरून केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून त्यांना सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
“मी स्पष्ट केले आहे की, ही वर्तवणूक अयोग्य असून घालून दिलेले नियम आणि परंपरांचे उल्लंघन आहे. माझ्यासाठी हे स्वीकारार्ह नाही; हे धक्कादायक आहे,” असे सिंधिया म्हणाले. तसेच त्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय आहे?
विवेक बन्झल हे १९८७ च्या बॅचचे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस ऑफिसर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना ३५ वर्षांचा नोकरीचा अनुभव आहे. ते बीएसएनएलमध्ये (कन्झ्युमर फिक्स्ड अॅक्सेस – CFA) संचालक आहेत. त्यांचा २५-२६ फेब्रुवारी रोजी प्रयागराज दौरा नियोजित होता. मात्र, या दौऱ्याचे तपशीलवार नियोजन काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या अधिकाऱ्याच्या दौऱ्यावेळी अंघोळीसाठी अंतर्वस्त्रे, तेल आणि कंगवे अशा गोष्टींचे नियोजन करण्यासाठी चक्क ५० कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.
त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या नियोजनामध्ये अत्यंत विस्तृत व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. ऑनलाइन व्हायरल झालेल्या त्या २१ मुद्द्यांच्या दस्तऐवजात दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा प्रचंड गैरवापर करण्यात आला होता. ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर आणि इंजिनिअर्स यांच्यासह सब-डिव्हीजनल आणि डिव्हिजनल इंजिनिअर्स अशा जवळपास ५० अधिकाऱ्यांकडे या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली होती.
यामध्ये संगमावरील स्नानापासून ते हनुमान मंदिर, अक्षयवट आणि पाताळपुरी मंदिराला भेट देण्यापर्यंत, बन्झल यांचा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी आदेशामध्ये तपशीलवार व्यवस्था करण्यात आली होती.
या तपशीलामध्ये हेअर ऑईल, अंतर्वस्त्रे, कंगवे, टूथपेस्ट, ब्रश, शेव्हिंग किट आणि चप्पल यांसारख्या वस्तूंच्या नियोजनाचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण आठ ‘बाथ किट्स’ तयार ठेवण्यात आले होते, ज्यापैकी सहा पुरुषांसाठी आणि दोन महिलांसाठी होते. तसेच, आंघोळीनंतरची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली होती, असे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे.
विवेक बन्झल यांच्या दौऱ्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीकेची झोड उठली. हा दौरा अधिकृत होता की सरकारी संसाधनांचा वापर वैयक्तिक आरामासाठी केला जात होता, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, यावरून टीका सुरू झाल्यानंतर हा दौरा नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना बीएसएनएलने म्हटले की, हा प्रकार त्यांच्या व्यावसायिक मानकांशी (Standards) आणि मूल्यांशी सुसंगत नाही.
“संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. तसेच घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पुन्हा एकदा जारी करण्यात आल्या आहेत. बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी आचारसंहिता आणि सूचनांचे पूर्णपणे पालन करावे, याची आठवण करून देण्यात आली आहे,” असे बीएसएनएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

