BSP leader Surendra Sagar Expels : राजकारण म्हटलं की हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोप आलेच. मात्र, कधी-कधी राजकारणात व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणं किंवा भूमिका घेणं असे प्रकार देखील पाहायला मिळतात. आता असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरचे बसपाचे नेते सुरेंद्र सागर यांच्यावर बसपाच्या प्रमुख मायावती यांनी हकालपट्टीची कारवाई केली आहे. मात्र, हकालपट्टी करण्याचं कारण ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे.
सुरेंद्र सागर हे बसपाचे नेते असून ते माजी मंत्री देखील आहेत. तसेच तब्बल पाचवेळा बसपाचे चे जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. मात्र, सुरेंद्र सागर यांनी आपल्या मुलाचं लग्न समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी केल्यामुळे त्यांची बसपामधून हकालपट्टी केल्याचा आरोप सुरेंद्र सागर केला आहे. तर आमदार त्रिभुवन दत्त हे एकेकाळी बसपाचे खासदार आणि आमदारही राहिलेले आहेत. मात्र, त्रिभुवन दत्त आता’सपा’चे आमदार आहेत.
सपा प्रमुख अखिलेश यादव हे काही दिवसांपूर्वी आंबेडकर नगर येथील त्रिभुवन दत्त यांच्या घरी गेले होते. मात्र, आता मायावती यांनी सुरेंद्र सागर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, तर त्यांच्या जागी जिल्हाध्यक्ष पदावर ज्ञानप्रकाश बौध यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. तसेच सुरेंद्र सागर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, सुरेंद्र सागर यांनी त्यांच्यावर पक्षविरोधी करवाया केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, सुरेंद्र सागर हे बरेली विभागात बसपाचे मोठे नेते मानले जातात आणि त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्यांनी मिलक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सुरेंद्र सागर यांची बसपामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे आपण कोणतीही पक्षविरोधी भूमिका घेतली नाही. मात्र, आपल्या मुलाचा विवाह समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आल्याचं कारण त्यांनी सांगितलं.