भारत-चीन सीमावादावरुन सध्या देशात चांगलचं राजकारण पेटलं आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या मुद्द्यांवर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वोसर्वा मायावती यांनी भाजपाच्या भूमिकेला पाठींबा दर्शवला आहे.

भाजपा आणि काँग्रेसच्या राजकारणावर टीका करताना मायावती म्हणाल्या, “चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे. यांच्या परस्परांच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.”

आणखी वाचा- “करोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको”

एकीकडे देशातील नागरिक कोविड १९ महामारीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत आहे. तर दुसरीकडे सातत्याने इंधनाच्या किंमतीत वाढ होत असल्याने याची देखील नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशातील इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.