लखनौ : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बिघडल्याने गैरप्रकार झाले असून कुणालाही मत दिले तरी ते भाजपच्या खात्यावर गेल्याची उदाहरणे आहेत, अशी टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घेऊन उर्वरित सहा टप्प्यातील मतदानात सगळीच मते  भाजपला जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मायावती यांनी सांगितले,की निवडणूक आयोगाने आताच कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर आताची निवडणूक प्रक्रिया काही उपयोगाची नाही. पहिल्या टप्प्यातील चुका सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

सात टप्प्यांच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा गुरूवारी झाला, त्यात ९१ मतदारसंघात ९ कोटी लोकांनी मतदान केले.

पहिल्या टप्प्यातील मतदानात अनेक गैरप्रकार झाले असून पोलिस व अधिकृत यंत्रणा यांचा गैरवापर करण्यात आला तसेच निवडणूक यंत्रे बिघडल्याने कुठलेही बटन दाबले तरी भाजपला मते गेल्याच्या घटना घडल्या आहेत,असे  सांगून त्या म्हणाल्या,की ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली असून यावर समाधानकारक तोडगा काढण्याची गरज आहे.

विविध माध्यमांनीही मतदान यंत्रे बिघडल्याच्या बातम्या दिल्या असून काही ठिकाणी  दलितांना लाठीमार व  गोळीबार करून मतदानास जाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोपही  यावेळी मायावती यांनी केला.