२०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी नवी दिल्लीत सांगितले. आम्ही काँग्रेस किंवा भाजप या प्रमुख राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करणार नसून, राज्यातील संपूर्ण ४०३ जागा स्वबळावरच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१७ मध्ये सुरुवातीलाच उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सध्या नवी दिल्लीमध्ये असलेल्या मायावती संसद भवनाबाहेर पत्रकारांना म्हणाल्या, आमच्या पक्षाची कोणत्याही पक्षासोबत कसलीही आघाडी नाही. आम्ही स्वबळावर राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढविणार आहोत. आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली असल्याची खोटी माहिती समाजवादी पक्षाकडून पसरवली जाते आहे. मात्र, आमची कोणाशीही आघाडी नाही. समाजवादी पक्षच भाजपसोबत युती करणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
बसप उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, ते मायावती यांनी फेटाळले. ती माहिती चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.