बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते व २००९च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या दीपक भारद्वाज यांची आज दक्षिण दिल्लीत राजोक्री भागात त्यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसून तीनजणांनी गोळय़ा घालून हत्या करण्यात आली.
भारद्वाज हे शिक्षण, हॉटेल व मालमत्ता विक्री व्यवसायात होते. आज सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली. तिघे हल्लेखोर स्कोडा गाडीतून नीतेशकुंज या त्यांच्या फार्म हाऊसजवळ आले व घरात घुसून त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या अशी माहिती दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी दिली.
२००९मध्ये भारद्वाज यांनी लोकसभेच्या वेळी त्यांची मालमत्ता ६०० कोटी असल्याचे जाहीर केले होते.
नीतेश कुंज येथे विवाहासाठी जागा बुक करायची आहे असे सांगून हल्लेखोर आत आले, आत आल्यानंतर त्यांनी भारद्वाज यांच्याशी बोलणे सुरू केले व नंतर अचानक अगदी जवळून गोळय़ा झाडल्या, असे कुमार म्हणाले.
ज्या गाडीतून हल्लेखोर आ े होते त्याचे व्हिडिओ फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हत्येमागे काहीही कारणे असू शकतात, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. भारद्वाज यांना हल्ल्यानंतर लगेचच लष्कराच्या धवला कुआ भागातील रीसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.  
भारद्वाज यांनी २००९ची लोकसभा निवडणूक पश्चिम दिल्ली मतदारसंघातून बसपच्या तिकिटावर लढवली होती, पण काँग्रेसचे महाबळ मिश्रा यांनी त्यांना पराभूत केले होते. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची ३६८.२२ कोटींची शेतजमीन होती व त्यांच्या पत्नीच्या नावे १००.३५ कोटींची जमीन आहे. इतर मालमत्तांबरोबरच २८.७५ कोटी रुपये किमतीच्या इमारती त्यांच्या मालकीच्या आहेत.