Union Budget 2026 analysis : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (रविवारी) सलग नववा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी कोणत्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आरोग्य क्षेत्रासाठी १ लाख कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. तसेच, ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच देशभरात ७ अतिजलद रेल कॉरिडॉर्सची घोषणाही करण्यात आली आहे. एकंदरीत निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे.

निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे ही एक ऐतिहासिक घटना असून सलग नऊ वर्ष अर्थसंकल्प सादर करणे ही सोपी गोष्ट नसल्याचे गिरीश कुबेर यांनी नमूद केले. पुढे अर्थसंकल्पाबाबत बोलताना कुबेर म्हणाले की, नऊ अर्थसंकल्पांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे वित्तीय तूट. ही सरकारने सातत्याने साडेचार टक्क्यांपेक्षा कमी राखलेली आहे ही अतिशय कौतुकाची बाब आहे. कारण ज्या क्षणाला वित्तीय तूट हातातून निघून जाते, वाढत जाते तेव्हा सर्व खर्चांवर ताण येतो. उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढून सरकारला बऱ्याच गोष्टींवर हात आखडते घ्यावे लागतात. या सरकारवर ती वेळ आलेली नाही, याचे कारण म्हणजे अर्थमंत्र्यांना वित्तीय तूट मर्यादित राखण्यात आलेले यश हे आहे. या यशासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे.

अर्थसंकल्पामध्ये सूक्ष्मजीव शास्त्र क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणि सेमीकंडक्टर मिशनसाठी घेतलेले निर्णय देशाच्या भविष्यासाठी दूरगामी ठरतील असेही कुबेर यांनी नमूद केले. सूक्ष्मजीव शास्त्राबद्दल १० हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे, सेमिकंडक्टर मिशनसाठी घेतलेला निर्णय, दुर्मिळ संयुगांसाठी सरकार राबवत असलेली मोहिम, क्रीडा क्षेत्रातील साधन सामग्रीसाठी भारतात उत्पादन केंद्र निर्माण करणे हे सर्व निर्णय महत्त्वाचे असल्याचे कुबेर म्हणाले.

आत्ताच्या देशभरातील औद्योगिक आस्थापना आहेत त्यापैकी २०० महत्त्वाच्या अस्थापनांना निवडून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रामधील उद्याचे विजेते शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा उद्योग निधी निवडला जाणार आहे, ही देखील महत्त्वाची घडामोड आहे असे गिरीश कुबेर म्हणाले.

या अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्रासमोरची आव्हाने आणि उद्याचा विकसित भारत घडवण्यासाठी बँकिंग क्षेत्राला काय करावे लागेल यासाठी उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुबेर यांनी बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने याबद्दलही भाष्य केले आहे.