नवी दिल्ली : चीन सीमेबाबत संवेदनशील माहिती संसदेच्या पटलावर उघडपणे मांडता येणार नाही. त्यामुळे या मुद्दय़ावर अधिक चर्चा करणे योग्य नसल्याचे सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. मंगळवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बहुजन समाज पक्षाचे खासदार रामजी यांनी चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर संसदेमध्ये चर्चेची मागणी केली. लडाखच्या काही भागांमध्ये चीनने घुसखोरी केली असून त्याबाबत सविस्तर माहिती केंद्र सरकारने दिली पाहिजे, असे रामजी म्हणाले. त्यावर, राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप केला. भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केलेली नाही. गलवानमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न आपल्या जवानांनी हाणून पाडला आहे. जवानांनी सीमेच्या रक्षणासाठी बजावलेले कर्तव्य कौतुकास्पद असल्याचे सांगत संरक्षणमंत्र्यांनी सभागृहांमध्ये ही मागणी फेटाळली. अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याची चित्रफीत प्रसारमाध्यमांतून बाहेर आल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारला तातडीने दोन्ही सभागृहांमध्ये स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी घुसखोरीचा प्रयत्न आपल्या जवानांनी हाणून पाडल्याचे एक पानी निवेदनात म्हटले होते. त्यानंतर, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काँग्रेसकडून चीनचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारले असता नियमांअंतर्गत योग्यरीत्या उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर केंद्र सरकार संसदेमध्ये चर्चा करेल, असे उत्तर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले. विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया? अदानी, बीबीसी वृत्तपट ऐरणीवर शेअर बाजारातील अदानी समूहाचा कथित हस्तक्षेप आणि गुजरात दंगलीसंदर्भात मोदींवरील बीबीसीचा वृत्तपट या दोन्ही अत्यंत वादग्रस्त मुद्दय़ांवरही चर्चेची मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने अदानी समूहाने समभागांची किंमत कृत्रिमरीत्या वाढवण्याचे एका अहवालात म्हटले आहे. असे असताना या प्रकरणाची चौकशी का केली जात नाही? सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणा कुठे गेल्या, असा प्रश्न आम आदमी पक्ष, भाकप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांनी उपस्थित केला. ‘बीबीसी’च्या वृत्तपटावर चर्चेची आग्रही मागणी तृणमूल काँग्रेसने केली. Budget 2023 : “मी मध्यमवर्गीयच, तुमच्या त्रासाची मला कल्पना आहे”; बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार केंद्रीय अर्थसंकल्प उद्या ’मंगळवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होईल. ’दुपारी आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला जाईल.बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२३-२४ या वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करतील. ’अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल. दुसरा टप्पा १३ मार्च ते ६ एप्रिल या काळात होईल.