नवी दिल्लीतील इंडिया गेटवर गेली ५० वर्षे जळत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे. मात्र, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. अमर जवान ज्योतीची ज्योत विझलेली नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. ती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्वालामध्ये विलीन केले जात आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनीष तिवारी यांनी या निर्णयावरुन भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाने राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले आहे. याचा अर्थ ते अमर जवान ज्योती विझवू शकतील असे नाही. जे काही केले जात आहे ती राष्ट्रीय शोकांतिका आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमर जवान ज्योती युद्ध स्मारक मशालीत विलीन करणे म्हणजे इतिहास पुसणे आहे,” असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. “आमच्या वीर जवानांसाठी जळत असलेली अमर ज्योती आज विझणार आहे, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत. हरकत नाही आम्ही अमर जवान ज्योती पुन्हा एकदा आमच्या सैनिकांसाठी पेटवू,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

दरम्यान, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, अमर जवान ज्योती शुक्रवारी दुपारी इंडिया गेटपासून फक्त ४०० मीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील जळत्या ज्योतीमध्ये विलीन केली जाईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावरही लोक वेगवेगळी मते देत आहेत. सरकारचे हे पाऊल योग्य असून ब्रिटिशांनी बांधलेल्या इंडिया गेटमध्ये जळत असलेली अमर जवान ज्योती नॅशनल वॉर मेमोरियलमध्येच ठेवावी, असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इंडिया गेटमध्ये ठेवलेली अमर जवान ज्योती लोकांच्या आठवणी जोडल्या जातात, असे मानणारा एक वर्ग आहे. अशा परिस्थितीत युद्धस्मारकावर स्वतंत्रपणे दिवा लावता आला असता, असे काहींचे म्हणणे आहे.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले, जिथे २५,९४२ सैनिकांची नावे लिहिली गेली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building a war memorial does not mean extinguishing amar jawan jyoti congress manish tewari reply on the center abn
First published on: 21-01-2022 at 13:38 IST