इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरच्या विजयनगर भागात शनिवारी पहाटे एका तीनमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका जोडप्यासह ७ जणांचा जळून मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. विजयनगरातील दाटीवाटीच्या आणि पोहोचण्यासाठी अरुंद गल्ल्या असलेल्या स्वर्ण बाग कॉलनी भागातील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या विजेच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ही आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करतानाच, आगीच्या तपासाचा आदेश दिला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी इमारतीत अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी घटनास्थळी उशिरा पोहोचले. काही रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी सदनिकेच्या बाल्कनीतून उडय़ा मारल्या व यात काही जण जखमी झाले, असा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला. अग्निशामक दल वेळेवर आले असते तर लोकांचे जीव वाचले असते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

‘‘आग लागल्यानंतर तळमजल्यावरील इमारतीच्या मुख्य दाराभोवतीचा भाग आणि जिना ज्वाळा व काळय़ा धुराने वेढला गेला; तर तिसऱ्या मजल्यावरून टेरेसकडे जाणारे दार आगीमुळे अतिशय गरम झाले. यामुळे बहुतांश लोक इमारतीत अडकून पडले. काही लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी फ्लॅटच्या बाल्कनीकडे धावले,’’ असे उपायुक्तांनी सांगितले. तर, अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाच्या बंबांना इमारतीपर्यंत पोहोचणे अतिशय कठीण झाल्याचे स्थानिक ठाणेदार म्हणाले.

मरण पावलेल्या सात जणांमध्ये ईश्वर सिंह सिसोदिया व त्यांची पत्नी नीतू सिसोदिया यांचा समावेश आहे. त्यांचे नव्या घराचे जवळच बांधकाम सुरू असल्यामुळे हे जोडपे या इमारतीतील एका सदनिकेत भाडय़ाने राहात होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त संपत उपाध्याय यांनी दिली. आकांक्षा नावाच्या महिलेचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. आगीत ९ जण जखमी झाले. मृत व जखमी हे सर्व २५ ते ४५ वर्षे वयोगटातील होते. तिसऱ्या मजल्यावर अनेक लोक सदनिकांत राहात होते.