Bulandshahr violence: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेले पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांनी अखलाक मृत्यू प्रकरणाचाही तपास केला होता. अखलाकच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सुबोध कुमार सिंह यांनी अथक परिश्रम घेतले होते, अशी आठवण त्यांचे सहकारी सांगतात.
बुलंदशहरामध्ये गेले तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर गोहत्या झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली आणि हिंसाचार सुरु झाला. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोहत्येच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घेराव घातला. काही समाजकंटकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला.
सुबोध कुमार सिंह आणि अखलाक मृत्यूप्रकरण
उत्तर प्रदेशमधील दादरी येथे २०१५ साली महंमद अखलाक याची गोमांस बाळगल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुबोध कुमार सिंह यांच्याकडेच होता. सप्टेंबर २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ते या गुन्ह्याचे तपास अधिकारी होते, अशी माहिती उत्तर प्रदेशमधील मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी दिली. दादरी हत्याकांडाच्या वेळी सुबोध हे नोएडातील जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आरोपींच्या अटकेसाठी सुबोध कुमार यांनी कठोर भूमिकाही घेतली होती. काही महिन्यांमध्येच त्यांची वाराणसीत बदली झाली. २०१६ साली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले. अद्याप या प्रकरणातील १८ आरोपींना शिक्षा झालेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
धाडसी सुबोध
‘सुबोध कुमार सिंहने कधीच पळ काढला नाही. प्रत्येक प्रसंगाला धाडसाने सामोरे जायची त्याची वृत्ती होती’, असे लखनौतील पोलीस अधिकारी अनुराग सिंह सांगतात. त्यांनी काही वर्ष सुबोध कुमार यांच्यासोबत काम केले होते. ‘दादरीनंतर सुबोध कुमार त्या गावात जायचे. अफवा पसरु नये यासाठी प्रयत्न करायचे. गावात मुस्लीम समाजात एक विवाह सोहळा होता. अखलाकच्या हत्येनंतर हा विवाहसोहळा होणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता हा विवाहसोहळा होऊ द्यायचा, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती, असे सिंह यांनी सांगितले.
सुबोध यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
सुबोध हे उत्तर प्रदेशच्या इटाह जिल्ह्याचे होते. त्यांचे वडील राम प्रताप सिंह हे देखील उत्तर प्रदेशमधील पोलीस दलात होते. वडिलांचे दिर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी सुबोध कुमार यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. सुबोध हे सध्या त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह नोएडात राहत होते. त्यांचा एक मुलगा शाळेत असून दुसरा मुलगा अभियंता शाखेचा विद्यार्थी आहे. सुबोध यांचे मोठे बंधू हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत, असे सुबोध यांचे नातेवाईक सांगतात. १९९५ मध्ये सुबोध हे पोलीस दलात रुजू झाले होते.