भारतातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला झालेल्या कथित विलंबावरून जपानने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या बुलेट ट्रेन प्रकल्पातील विलंबासाठी भारताला जबाबदार धरत जपानच्या एका माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पातील विलंबासाठी भारतीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वाटाघाटीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा दावा देखील हिदेकी माकिहारा यांनी केला. या संदर्भात माकिहारा यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केलं.

दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी केलेल्या टीकेला आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून हिदेकी माकिहारा यांनी केलेले सर्व आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फेटाळून लावले आहेत. माकिहारा यांचं वक्तव्य हे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?

जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून केलेल्या टीकेला रणधीर जयस्वाल यांनी प्रत्युत्तर देत हे त्यांचं वैयक्तिक मत असून ते वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचं म्हटलं आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेन प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चा योग्य दिशेने पुढे जात असल्याचा दावा रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

“तसेच मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेनबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चा सकारात्मकपणे पुढे जात आहे. जपान ‘ई-२०’ श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे. मात्र, त्या २०३० च्या सुरुवातीला उपलब्ध होतील. संबंधित ट्रेनची निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पाचं बांधकाम वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल. हाय-स्पीड ट्रेनची सेवा सुरू करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. हाय-स्पीड ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या उद्दिष्टाला अनुसरून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे”, असं स्पष्टीकरण रणधीर जयस्वाल यांनी दिलं.

हिदेकी माकिहारा यांनी काय म्हटलं होतं?

बुलेट ट्रेन प्रकल्पाला झालेल्या विलंबाला पूर्णपणे भारत जबाबदार असल्याचा आरोप हिदेकी माकिहारा यांनी केला. माकिहारा यांनी म्हटलं होतं की, “काहीही झालं तरी ते (भारत) दिलेलं वचन पाळत नाहीत. एखादं वचन दिलं, तर ते लगेच त्यापासून माघार घेतात किंवा शब्द फिरवतात. या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बैठका आणि वाटाघाटींदरम्यान भारतीय मंत्र्यांच्या बाजूने आलेली बेजबाबदारपणाची वृत्ती वारंवार दिसून आली होती. त्यामुळे काही झालं तरी ते दिलेलं वचन पाळत नाहीत”, अशा शब्दांत हिदेकी माकिहारा यांनी टीका केली होती.

Bullet Train Project Delay MEA
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी काय टीका केली होती?

“तसेच या प्रकल्पासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या सर्व जपानी लोकांप्रती आदर बाळगून मला हे सांगावं लागतंय की, हा प्रकल्प लवकर पूर्ण न होण्यास भारतीय बाजू पूर्णपणे जबाबदार आहे. अगदी जपानच्या पंतप्रधानांच्या भेटीतून देखील काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे भारत-शिंकान्सेन प्रकल्प अयशस्वी ठरला आहे”, अशी टीका हिदेकी माकिहारा यांनी केली होती.