मेघालयमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. दरम्यान आता, या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस बुधवारी (२९ सप्टेंबर) रात्री १२ वाजता नोंगच्राममधील रिंगडी नदीत कोसळली. यावेळी, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान, आतापर्यंत चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोन मृतदेह अजूनही बसमध्येच असल्याची माहिती समोर येत आहे. या मृतांमध्ये बस चालकाचा देखील समावेश आहे. ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

मेघालयातील या अपघातग्रस्त बसमध्ये किमान २१ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १६ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात नोंगश्रम पुलावर झाला. हा भाग ईस्ट गारो हिल्स आणि वेस्ट खासी हिल्स जिल्ह्याची सीमा आहे. या बसमधील काही जखमी प्रवाशांनी येथील स्थानिकांना सांगितलं की, हा अपघात झाला तेव्हा बस वेगात होती. यावेळी, “बसचा पुढचा भाग पुलाच्या कडांना आदळला आणि बस पाण्यात कोसळली”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.