scorecardresearch

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’; ममता बॅनर्जी लढणार पोटनिवडणूक

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’; ममता बॅनर्जी लढणार पोटनिवडणूक
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (photo indian express)

पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेची विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने जिंकली. २ मे २०२१ रोजी लागलेल्या निवडणूक निकालात भाजपाला रोखत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ही माहिती दिली.

पोटनिवडणूकीबाबत आयोगाने म्हटले आहे की, मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी केली जाईल. तसेच ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवू शकतात. तसेच निवडणूक आयोगाने कोविड -१९ ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

“घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ १५९ -भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत.” असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा – ‘हा’ कायद्याचा गैरवापर! म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना दिला धक्का

निवडणूक आयोग स्पष्ट केले की, “संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मत आणि इनपुट लक्षात घेऊन इतर ३१ विधानसभा मतदारसंघ आणि ३ संसदीय मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

एप्रिल-मे मध्ये झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने प्रचंड विजय मिळवला आणि २९४ पैकी २१३ जागा जिंकल्या. मात्र, ममता बॅनर्जी यांना नंदीग्रामची जागा गमवावी लागली होती. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असलेले भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममतांना जवळच्या लढतीत पराभूत केले होते.

२०१९ मधेही असेच घडले होते

२०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपा तिसऱ्या स्थानी होतं. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांचं विजयी अंतर कमी झालं होतं. तेव्हा त्यांनी काँग्रेस उमेदवार दीपा यांना २५,३०१ मतांनी पराभूत केलं होतं. मात्र यावेळेस त्यांनी भाजपाला आव्हान देत नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता आणि भवानीपूर मतदारसंघ सोडला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2021 at 15:45 IST

संबंधित बातम्या