नवी दिल्ली / लखनौ / संगरूर : उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड हे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने काबीज केले, तर पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात तेथील सत्ताधारी ‘आप’ला शिरोमणी अकाली दलाने धक्कादायकरीत्या पराभूत केले. 

उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपचे उमेदवार घन:श्याम लोधी यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघात ४२ हजार मताधिक्याने विजय मिळवला. लोधी यांनी समाजवादी पक्षाचे मोहम्मद असीम रजा यांचा पराभव केला. रजा हे ‘सप’चे ज्येष्ठ नेते मोहम्मद आझम खान यांचे निकटवर्तीय आहेत. ही जागा आझम खान यांनी २०१९ मध्ये जिंकली होती, परंतु विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. 

Direct fight between BJP and Congress in East Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : पूर्व नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत; परप्रांतीयांचा कौल निर्णायक ठरणार
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
ram arun govil in loksabha bjp
‘प्रभू रामचंद्रां’चे निवडणुकीच्या रणधुमाळीत आगमन; भाजपाचा काय विचार?
kangana ranaut
कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

समाजवादी पक्षाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या आझमगडमध्येही भाजपचे दिनेशलाल यादव ‘निरहुआ’ यांनी समाजवादीचे धर्मेद्र यादव यांचा साडेआठ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव निवडून आले होते, परंतु विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. तिची मतमोजणी रविवारी करण्यात आली. त्रिपुरात विधानसभेच्या चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने विजय मिळवला असून भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचा समावेश आहे. साहा यांनी एकूण मतदानापैकी सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवली.

राजधानी दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभेची जागा मात्र आपने जिंकली. तेथे आपचे दुर्गेश पाठक यांनी भाजपच्या राजेश भाटिया यांचा ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्रिपुरा आणि झारखंडमधील प्रत्येकी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. त्रिपुरात गेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या काँग्रेसने पोटनिवडणुकीत एका जागेवर विजय मिळवून खाते उघडले आहे. आगरतळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुदीप रॉय बर्मन तीन हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपच्या अशोक सिन्हा यांचा पराभव केला. 

झारखंडच्या मंदर मतदारसंघातून काँग्रेसच्या शिल्पी नेहा टिर्की यांनी भाजपच्या गंगोत्री कुजूर यांचा २३,५१७ मतांनी पराभव केला, तर आंध्र प्रदेशातील आत्मकुरुची जागा सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने जिंकली आहे. तेथे मेकापती विक्रम रेड्डी यांनी भाजपच्या जी भारत कुमार यादव यांचा ८२ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. यादव यांना अवघी १९ हजार मते मिळाली. 

उत्तर प्रदेशातील डबल इंजिन सरकारने केलेल्या कामांमुळे लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. जातीय तणाव निर्माण करणाऱ्या जातीवादी आणि घराणेशाहीवादी पक्षांना स्वीकारण्यास  आपण तयार नसल्याचा संदेश लोकांनी दिला आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.

दिल्लीची राजिंदर नगरची जागा जिंकल्यानंतर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केंजरीवाल यांनी, ‘‘लोकांनी गलिच्छ राजकारणाचा पराभव करून चांगले काम स्वीकारले,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंजाबमध्ये आपला धक्का

पंजाबमध्ये महिन्याभरापूर्वी सत्तेवर आलेल्या ‘आप’ला संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. ही जागा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोनदा जिंकली होती; परंतु पोटनिवडणुकीत ‘आप’चे गुर्मेल सिंग यांचा शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांनी ५,८२२ मताधिक्याने पराभव केला. सिमरनजितसिंग हे ७७ वर्षांचे असून सुमारे २३ वर्षांनंतर ते या मतदारसंघातून विजयी झाले.