पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची तब्येत बिघडल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली. वेगवेगळ्या विधेयकांवर आणि प्रस्तावांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीच चर्चा होणार होती. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, पंतप्रधानांची तब्येत बिघडल्याने ती लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयकामध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणांवर या बैठकीत चर्चा होणार होती. देशाच्या आर्थिक आणि धोरणात्मक तसेच परराष्ट्र संबंधांना बाधा पोहचविणारी सर्व प्रकारची माहिती या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याची सुधारणा या विधेयकात सुचविण्यात आली आहे. त्यावर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. गेल्यावर्षीच या सुधारणांसह हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. मात्र, त्यावर अजून सखोल चर्चा झालेली नाही.