ट्रकचालकांच्या ‘डुलकी’ला घातला जाणार आवर! रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची अभिनव योजना!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्रकमध्ये स्लीप डिटेक्शन सेन्सर्स लावण्याचे निर्देश दिले आहेत.

nitin gadkari on truck driver sleep detection sensors
ट्रक अपघात कमी करण्यासाठी नितीन गडकरींचं महत्त्वाचं पाऊल!

देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा प्रशासनासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणाऱ्या अपघातांना यामुळे आवर घालण्यास मोठी मदत होणार आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. तसेच, दर दोन महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते. मंगळवारी झालेल्या या गटाच्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांवर तोडगा काढण्यासाठी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली असून त्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देखील दिले आहेत.

ट्रकमध्ये सेन्सर्स बसवणार!

मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचं देखील दिसून आलं आहे. त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये On-Board Sleep Detection Sensors अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांचं प्रमाण कमी होऊ शकेल.

ट्रक चालवण्याच्या तासांचं नियोजन!

देशात विमान व्यवसायामध्ये ज्या प्रमाणे पायलटच्या विमान उड्डाणाचे तास निश्चित असतात, त्याचप्रमाणे ट्रकचालकांचे देखील ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश यावेळी नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जिल्हा रस्ते समितीच्या नियमित बैठका होतील याची काळजी घेण्याचे निर्देश देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. तसेच, ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास देखील निश्चित करण्याचे निर्देश या पत्रांमधून देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.

दरम्यान, रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला हवी हे स्पष्ट करतानाच नितीन गडकरींनी या बैठकीमध्ये रस्ते सुरक्षा गटाच्या सदस्यांना यासंदर्भात लवकराच लवकर धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cabinet minister nitin gadkari directs sleep detection sensors sleeping hours for truck drivers pmw

Next Story
शिक्षकांनी सरळ बसायला सांगितल्याने विद्यार्थी संतापला; लोखंडी रॉडने केला हल्ला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी