गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदलावरून सुरू असलेल्या चर्चेवर अंशत: पडदा पडला असून रविवारी ९ नवीन चेहरे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांकडून समजते.  हरदीपसिंग पुरी, गजेंद्रसिंग शेखावत, सत्यपाल सिंग, अल्फान्सो कन्नथनम, अश्विनीकुमार चौबे, शिवप्रताप शुक्ला, वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, आर.के. सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर तीन विद्यमान राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार असल्याचे माध्यमातून सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत  बैठक झाली. अल्फान्सो कन्नथनम हे केरळ, शिवप्रताप शुक्ला हे उत्तरप्रदेश तर अनंतकुमार हेगडे हे कर्नाटकातून येतात. गुजरात, कर्नाटक या राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला आहे.

नव्या सदस्यांमध्ये ४ माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात २ आयएएस, १ आयपीएस आणि १ आयएफएस  अधिकाऱ्यांचा समावेश  आहे. मित्रपक्षांना उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान  देण्यात आलेले नाही. हे सर्व मंत्री उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत

शिवप्रताप शुक्ला
हे उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. ग्रामीण विकाससंबंधीत संसदीय समितीचे ते सदस्य आहेत. शुक्ला यांनी १९८९, ९१,९३ आणि १९९६ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात ग्रामीण विकास, शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातूनच १९७०मध्ये राजकारणात प्रवेश केला.

अश्विनीकुमार चौबे
हे बिहारच्या बक्सर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते राष्ट्रीय रेशम मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी बिहार विधानसभेचे सलग ५ वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी बिहारमध्ये आरोग्य, शहरी विकास आणि सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. अश्विनी कुमार यांनीही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातूनच राजकारणात प्रवेश केला.  त्यांनी प्राणिशास्त्रात त्यांनी बीएस.सी पदवी मिळवली आहे.

वीरेंद्र कुमार
हे मध्य प्रदेशातील टीकमगड लोकसभा मतदारसघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते सहावेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. ते विविध संसदीय समित्यांचे सदस्य आहेत. ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवला होता. अर्थशास्त्रात त्यांनी पदवीतर पदवी घेतली असून बालकामगार विषयांत पीएच.डी मिळवली आहे.

अनंतकुमार हेगडे
वयाच्या २८ व्या वर्षीच कर्नाटकातून लोकसभेत आलेले अनंतकुमार यांची संसदेतील ही पाचवी टर्म आहे ते विविध संसदीय समितीचे सदस्य आहेत. ते कदम्बा या स्वंयसेवी संस्थेचे अध्यक्ष आहेत.

आर.के.सिंह
बिहारच्या आरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आर.के.सिंह हे १९७५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय गृहसचिव म्हणूनही कार्यरत होते. दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

अल्फान्सो कन्नथनम
केरळ केडरचे १९७९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी. १९९४ मध्ये टाइम्स मॅगझीनने १०० यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत यांच्या नावाचा समावेश केला होता.

हरदीपसिंग पुरी
हे १९७४ च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी आहेत. विदेश निती आणि राष्ट्रीय सुरक्षेचे ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

सत्यपाल सिंह
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेशमधील बागपत लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात.

गजेंद्रसिंह शेखावत
राजस्थानमधील जोधपूर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. आर्थिक प्रकरणांच्या संसदीय समितीचे सदस्य आहेत.