Carbide Ripened Mangoes Identification Tips and Health Risks: यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे आंब्याचा बराचसा मोहोर गळून गेला. त्यामुळे कोकणासह अनेक भागातील आंब्याचे पीक वाया गेले. एप्रिल उजाडल्यानंतरही बाजारात आंब्याची आवक फारशी दिसून आलेली नाही. याचा फायदा घेऊन काही नफेखोर मंडळी लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. अवैध रसायनांचा वापर करून आंबा पिकवला जात असून आरोग्यास घातक असलेला आंबा अनेक ठिकाणी विक्रीस येत आहे. हैदराबादमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवत रसायनांचा वापर करून पिकवलेला आंबा जप्त केला.
४ एप्रिल रोजी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील दोन घाऊक फळ व्यापाऱ्यांना अटक केली. आंबे पिकवण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात रसायने वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चुडी बाजार येथे फळांचा व्यापार करणाऱ्या एकाने आंबे पिकवण्यासाठी डायमंड रायप इथिलिनचा वापर केल्याचे आढळून आले आहे.
हैदराबाद अन्न भेसळ दक्षता पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्यापारी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पिकवणारे रसायन वापरत होता. फळे पिकवणाऱ्या रसायनाची दोन डझनांहून अधिकची पाकिटे आम्ही जप्त केली आहेत. तसेच पोलिसांनी शहरातील विविध गोदामांमधून साधारण सात टन आंबे जप्त केले आहेत. हे आंबे इथिलीन आणि कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
हैदराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले की, आंबे पिकवण्यासाठी काही गोदामांत त्याची साठवणूक केली जाते. हे गोदाम, किरकोळ विक्रेते यांच्या दुकानांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी एच-फास्ड कडे देण्यात आली आहे.
आंबे घेताना सावधगिरी बाळगा
फळांचा राजा पुन्हा एकदा ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. पण ग्राहकांनी बाजारातून आंबे विकत घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेल्या आंब्यांच्या फसवणुकीला ग्राहकांनी बळी पडू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच सेंद्रिय अशा लेबलखाली विकल्या जाणाऱ्या आंब्यांपासूनही सावध राहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पिवळेधमक, चमकदार आंब्यांपासून सावध
हैदराबाद पोलिसांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “आंब्यांना नैसर्गिकरित्या पिकू देण्याऐवजी कॅल्शियम कार्बाइड आणि इतर धोकादायक रसायनांचा वापर करून त्यांना कृत्रिमरित्या पिकवले जात आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर एकसारखेच पिवळेधमक सोनेरी आणि चमकदार फळ दिसले तर ते घेण्यापूर्वी सावधान व्हा.”
पोलिसांनी पुढे म्हटले, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रंग पूर्णपणे एकसारखा नसतो. याउलट रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे चमकदार पिवळी दिसतात. पण आतून कच्ची आणि विषारी असतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, अशी फळे खाल्ल्याने घशात खवखव, मळमळ, उलटी आणि जुलाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
